ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…* *येवला उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यास शासनाची मंजुरी*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…*

*येवला उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यास शासनाची मंजुरी*

*नाशिक,येवला,दि.१ फेब्रुवारी :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १०० खाटांच्या येवला उपजिल्हा रुग्णालयात विशेष बाब म्हणून २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या सेंटर मध्ये अपघातग्रस्त व गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना येथील रुग्णालयातच चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला हे पैठणीचे माहेरघर आणि महत्वाचे तीर्थस्थळ असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येवला तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आरोग्याच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून येवला येथे १०० खाटांचे अद्ययावत सोयी सुविधा असलेले उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे ठिकाण गुजरातकडून शिर्डी पायी जाणाऱ्या पालखी मार्गावरील व वापी-पेठ नाशिक-औरंगाबाद प्रमुख राज्यमार्ग क्र. २ आणि सेंधना (म.प्र.) -नंदुरबार-मनमाड-येवला-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी या दोन्ही महामार्गांनी तसेच मनमाड- दौंड-पणजी आणि मनमाड- औरंगाबाद-सिकंदराबाद या दोन्ही लोहामार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे.

तसेच दक्षिण भारतातून शिर्डीला जाणारे हजारो प्रवाशी हे येवला येथील नगरसूल रेल्वे स्टेशनवरून मोटारीने शिर्डीला जात असतात. येवला तसेच जवळच असलेले लासलगाव हे आशिया खंडातील कांद्याचे सर्वात मोठे आगार आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारी लोकांची गर्दी व अपघाताचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी येवला येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्याची अत्यंत आवश्यकता होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. या ट्रामा केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांकडून अपघातग्रस्त व गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना येथील रुग्णालयातच उपचार मिळणार आहे.

शंभर खाटांच्या या येवला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णासाठी अत्याधुनिक अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आता या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात विशेष बाब म्हणून २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. सदर ट्रामा केअर सेंटर मध्ये एक स्वतंत्र ऑर्थोतज्ञ, चार डॉक्टर, दोन भूलतज्ञ व स्टाफ नर्स यांचा समावेश असणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!