ताज्या घडामोडी

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*अर्थसंकल्पातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच – छगन भुजबळ*

*मुंबई,नाशिक,दि.९ मार्च :-* राज्यावर वाढत असलेला कर्जाचा बोजा साडे सहा लाख कोटींहून अधिक असतांना प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता राज्यात नुकत्याच निवडणुकांमध्ये बसलेला फटका बघता राज्यातील जनतेला खुश करण्याच्या दृष्टीने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निव्वळ जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना छगन भुजबळ म्हणाले की, कांदा,कापूस,सोयाबीन, भाजीपाला आदी सर्व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यात एकीकडे शेतकरी शेतमालाची होळी करत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस अशी घोषणा करण्याची गरज असतांना कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अर्थसंकल्पातून तरी किमान आपल्याला मदत मिळेल याकडे आशा लाऊन बघत होता. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक शब्दही नाही. पंचामृतामधील थेंब काही त्यांच्या वाट्याला आला नाही.

ते म्हणाले की, राज्याचा विकासदर नेहमी देशाच्या विकास दरापेक्षा अव्वल असतो.मात्र राज्याच्या विकास दरामध्ये २.३ टक्यांची घसरण निश्चितच चिंताजनक आहे. देशाच्या विकासदरापेक्षा राज्याच्या विकासदराची घसरण झाली आहे.राज्यातील नागरिक महागाईने त्रस्त असून महागाई कमी करण्याच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसत नाही. केवळ भरीव तरतूद करू अशी निव्वळ धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. अनेक नवीन महामंडळांची घोषणा करून विविध समाजातील बांधवाना जवळ करण्याचा प्रयत्न म्हणजे आगामी निवडणुकीतील बेरीज वजाबाकी आहे. मुळात अगोदरच जी महामंडळे अस्तित्वात त्यांच्यासाठी निधीच्या तरतुदीबाबत कुठलीही स्पष्टता दिसली नाही. केवळ निधी देऊ असे म्हंटले आहे यावर जनता कितपत विश्वास ठेवेल हा प्रश्न असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नाशिक निओ मेट्रो प्रकल्प यासाठी निधी देण्यात येईल पण किती निधी उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये कुठलीही स्पष्टता नाही. इतर शहरांमध्ये मेट्रो आणि नाशिकची समजूत टायर बेस निओ मेट्रो देऊन का काढली. फक्त बस जाणारा फ्लायओव्हर असा त्याचा अर्थ. नाशिकला मेट्रो का नको? दमणगंगा-पिंजाळ नार पार इत्यादी नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून करू अशी घोषणा केली मात्र कुठल्याची निधीची तरतूद केलेली दिसत नाही. निव्वळ अनेक घोषणा करून जनतेला दिवसा स्वप्न दाखविण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मुळात ज्यांनी सत्तेवर येताच जनतेच्या हिताची कामे स्थगिती करण्याचा निर्णय घेतला. अद्याप त्यातील अनेक कामे स्थगित आहे. त्यांच्या तोंडून अनेक योजनांची घोषणा होतेय यावर जनता किती विश्वास ठेवेल ही शंकाच असल्याची सडकावून टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.
मोठमोठ्या रस्त्यांबद्दल भाष्य केले मात्र जिल्हा आणि तालुका स्तरावरील जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग रस्त्यांनी दुर्दशा कधी संपणार? त्याचप्रमाणे बेरोजगारी कमी करायची असेल तर जोपर्यंत मोठमोठे उद्योग येणार नाही तोपर्यंत रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही.

तसेच त्यांनी म्हटले आहे की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांच्या नावाने ओबीसिंसाठी स्वतंत्र घरकुल योजनेची आमची मागणी होती, अर्थसंकल्पात ओबिसिंसाठी घरकुल योजनेची घोषणा केली मात्र त्याला मोदी आवास घरकुल योजना असे नाव देण्यात आले.ओबीसी महामंडळाला एक रुपयाचीही तरतूद नाही.स्वाधार आणि स्वयंच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची घोषणा होईल असे वाटत होते मात्र ओबीसींचा भ्रमनिरास केला आहे.सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेच्या जागेचा विकास करून याठिकाणी आद्यमुलींची शाळा सुरु करावी व स्मारक विकसित करावे अशी आमची सातत्याने मागणी होती. याबाबत हे स्मारक विकसित करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची सुबुद्धी सरकारला आली त्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार देखील मानले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!