ताज्या घडामोडी

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा त्याग विस्मरणात जाऊच शकत नाही

*डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा त्याग विस्मरणात जाऊच शकत नाही*

*बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*
कागल प्रतिनिधी
अजिंक्य जाधव

*चंद्रपूर, ता. २३ :* देशातील दोन निशान, दोन संविधान आणि दोन प्रधानाला विरोध करणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान सहजसोपे नव्हते.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळेच आज काश्मिर भारतात आहे. त्यामुळे त्यांचा त्याग व बलिदान कधीही विस्मरणात जाऊच शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन (बलिदान दिनानिमित्त ) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,भाजपा जेष्ठ नेते राजेंद्र गांधी,माजी उपमहापौर राहुल पावडे,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या संबोधनात ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भाजपाने नेहमीच डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि देशप्रेमाचे स्मरण केले आहे. आणि भविष्यात करीत राहणार आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेबाबत आग्रही भूमिका घेतली होती. काश्मिरमध्ये अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी आंदोलन केल्याचे स्मरण ना. श्री. मुनगंटीवार यांनी करून दिले. भारतरत्न, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध होता. सत्तेच्या लालसेपोटी हा विरोध कायम होता अशी टीकाही त्यांनी केली.

सत्तेच्या लालसेपोटी देशाचे विभाजन करणाऱ्या काँग्रेसने काश्मिर, हैदराबाद आणि जुनागढ या तीन देशांतर्गत संस्थानामुळे डोकेदुखी वाढवली होती. पंडित नेहरू यांना पंतप्रधान व्हायची ईतकी घाई झाली होती की त्यांनी त्या घाईच्या भरात अनेक निर्णय चुकीचे घेतले असे नमूद करीत ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऐवजी पं. नेहरू यांनी स्वत:कडे पंतप्रधानपद घेतले. त्यानंतरही सरदार पटेल आणि डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी कडवी झुंज दिल्याचे गौरवद्गार ना. श्री. मुनगंटीवार यांनी काढले. या दोन कणखर नेत्यांमुळेच देशाचे अखंडत्व कायम राहिल्याचे ते म्हणाले.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी नसते तर काश्मिर कदाचित भारतात राहिले नसते त्यामुळे काश्मिरसाठी मुखर्जी यांचे बलिदान मोठे आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसने कलम ३७०चा डाव टाकत काश्मिरचे घोंगडे भीजत ठेवले . त्यामुळे अनेक वर्ष देशाला मनस्ताप सहन करावा लागला. देशातील दहशतवाद वाढला. सुमारे ७० वर्षांपर्यंत हे कलम लागु ठेवण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे राजकारण हे देशासाठी घातक असल्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसला सुरुवातीपासून केवळ खुर्ची आणि सत्ता एवढेच दिसते असा घणाघातही त्यांनी केला. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त काँग्रेस आणि त्यांच्यासारख्या पक्षांना धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे आणि हा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प प्रत्येकाने करावा असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे अनंत उपकार देशावरती आहेत असे आदरपूर्वक नमूद करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, केवळ त्यांचे उपकार व्यक्त करून पुरेसे होणार नाही. देशात आज विषाक्त विचार पेरणारे फिरत आहेत. त्यांच्यापासून देशाला वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे. हा संकल्प म्हणजेच या उपकारांची परतफेड होईल, असे ते म्हणाले.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य जनाजनाच्या मनामनात पोहोचावे अशी कृती प्रत्येकाने करावी असे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!