ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणूकीसाठी येवल्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज*

*लोकसभा निवडणूकीसाठी येवल्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज*

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी,20 दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय,नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती येवला विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

येवला विधानसभा मतदारसंघात एकूण 314551 मतदार आहेत. त्यापैकी 164534 पुरुष मतदार असून150013 स्त्री मतदार आहेत तर 4 तृतीयपंथी मतदार आहेत.

येवला मतदारसंघात एकूण 320 मतदान केंद्र आहेत.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित 2406 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे.यामध्ये सूक्ष्म निरीक्षक,30 क्षेत्रीय अधिकारी, 30 पर्यवेक्षक, 355 मतदान केंद्राध्यक्ष,355 सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष त्याचबरोबर महिला कर्मचारी यांच्यासह 700 इतर मतदान अधिकारी,335 शिपाई कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यावर्षी प्रथमच पाळणाघर, हिरकणी कक्ष, प्रतीक्षालय यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी 200 अंगणवाडी सेविका,123 आशासेविका यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
तसेच वृद्ध, दिव्यांग, गरोदर महिला, लहान बालक सोबत असलेले मतदार यांच्या सहाय्यतेसाठी186 स्वयंसेवकांची नेमणूक मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे.

मतदारांच्या जनजागृतीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांचे मार्फत मतदार चिठ्ठीचे वाटप मतदारांना करण्यात आलेले आहे.यामुळे मतदारांना मतदानाची वेळ, ठिकाण,मतदान केंद्राचा क्रमांक, यादी भाग क्रमांक इत्यादी गोष्टी मतदानाला जाण्यापूर्वी समजतील यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल.

*मतदान केंद्रावर वेब कास्टिंग द्वारे ठेवणार नजर*
येवला विधानसभा मतदारसंघातील 50% मतदान केंद्रावर वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार मतदान केंद्रावर जाताना मोबाईल, स्मार्टवॉच,ई गॅजेट,पाण्याची बाटलीसह इतर कोणतेही साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

*”पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर”*
मतदान प्रक्रिये दरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये,मतदान शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडल्यास, कायद्याचा भंग झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.

*विशेष मतदान केंद्रांची रचना*
येवला शहरातील 2 केंद्र महिला अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असतील.या केंद्रावरील केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी इतर कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय पथक यामध्ये महिलांचा समावेश असेल.
त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचारी असलेले एक मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर युवक मतदारांना मतदानास प्रोत्साहन मिळावे याकरिता येवला शहरात दोन मतदान केंद्रावर तरुण मतदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

*राष्ट्रीय उत्सवासाठी वाहनांचा ताफा सज्ज*

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी मतदान अधिकारी व मतदान यंत्र सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 40 बस,11 मिनीबस,खाजगी 70 वाहने त्याचबरोबर 6 शासकीय वाहनांचा ताफा सज्ज झालेला आहे.

*साहित्य वाटप व स्वीकृती साठी विशेष नियोजन*
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यानुसार निवडणूक साहित्य व ईव्हीएम वाटप व स्वीकृती केंद्रावरती वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहार,पिण्याच्या पाणी, वैद्यकीय सुविधा,प्रसाधनगृह या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

*20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाही बळकट करण्यास हातभार लावावा. — बाबासाहेब गाढवे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी येवला विधानसभा मतदारसंघ*

*लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सुलभ,सुरळीत आणि निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी,कर्मचारी व यंत्रणेने आपले काम चोखपणे करावे यामध्ये कसल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. – आबा महाजन, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी येवला विधानसभा मतदारसंघ*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!