ताज्या घडामोडी

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी* ————- *लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* ————- *अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण* ————- *पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित*

*आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*
————-
*लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
————-
*अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण*
————-
*पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित*

जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात ३ कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव येथील विमानतळ परिसरातील प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते.

राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्वपूर्ण आहे. मागील एक महिन्यात 11 लाख दीदी लखपती बनल्या. यात 1 लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. लखपती दीदी हे संपूर्ण परिवाराला सशक्त बनविण्याचे अभियान आहे. महिला लखपती दीदी बनने हे संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिलांसाठी ३ कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात 70 टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत 10 कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत 9 लाख कोटीची मदत केली, असे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिला बचतगटांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*भाविकांना आदरांजली*
दरम्यान, आपल्या भाषणात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटूंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

*मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार -एकनाथ शिंदे*

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

देशाच्या ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे छोटे उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात २५ हजार स्वयंसहायता गटांना ३० कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना – शिवराजसिंह चौहान*

लखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी अशी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्द्ल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले. महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी झाल्या आहेत.त्यांनी इतरांना प्रेरित करावे, असेही त्यांनी नमूद केले.

*देशाच्या विकासात नारीशक्तीचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी साहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज नारीशक्ती विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या या विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही. संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत 75 लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

*राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री अजित पवार*

संपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे. केळी, कांदा उत्पादन साठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात 50 लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्य शासनाचे प्राधान्य नेहमीच महिलांना सजग, सक्षम आणि सुरक्षित बनविण्याचे राहिले आहे. राज्य शासन नेहमीच महिलांच्या पाठिशी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

*लखपती दीदींचा प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून सन्मान*

दरम्यान, आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.

*उघडया जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादन*

प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.
0000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!