ताज्या घडामोडी

मराठवाडा विभागिय { वृृृृृृत्त औरंगाबाद }

“महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरु केल्या.” असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटलांच्या या वक्तव्यानंतर औरंगाबादसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंबेडकरवादी रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबाद मध्ये पाटलांविरोधात आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र निदर्शने केली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

“निधीसाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली.” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात केले. त्यामुळे वाद निर्माण झालाय.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “इमारतींना निधी कसा द्यायचा हे रस्तोगी आम्हाला शिकवतील. परंतु चांगल्या कामासाठी मी आणि संदीपान भुमरे मिळून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे  गेलो तर पैशांना अडचण येणार नाही. सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते, दहा – दहा कोटी रुपये देणारेही होते.”

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतल्याशिवाय पॅंथर स्वस्थ बसणार नाही – रमेशभाई खंडागळे

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झालाय. ‘ज्या महापुरुषांनी तत्कालीन समाजाच्या रुढी, परंपरा, चालीरितींना छेद देता  शिक्षणाचे द्वार दलित, आदिवासी, मागास समाजासाठी खुले केले. त्यांचे यत्न हे भीकेवर आवलंबून होते’, असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांचा घोर अपमान केल्याचं भारतीय दलित पॅंथरचे अध्यक्ष ॲड. रमेशभाई खंडागळे यांनी म्हटले आहे. ‘खोटा इतिहास रचून, महापुरुषांचा इतिहास डागाळण्याचं काम भाजप आणि संघाकडून जाणीवपूर्वक केलं जात आहे.’ चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी रमेशभाई खंडागळे यांनी केली आहे. ‘पाटील यांच्या माफीने काही होणार नाही, त्यांच्या राजीनाम्याशिवाय पॅंथर स्वस्थ बसणार नाही.’असा इशारा ॲड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी म्हणाल्या की, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात ‘भाज्यपाल’ कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सगळे भाजपाचे नेते आपल्या देशाच्या महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करीत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. आणि तिथेच हे भाजपाई जाणून बुजून त्यांचा अपमान करीत आहेत. परंतु आम्ही आता हे सहन करणार नाही.

…तो पाटलांच्या घरासमोर आंदोलन – काॅंग्रेस

संगीता तिवारी म्हणाल्या की, भाजपाच्या नेत्यांना खरंच लाजच राहिली नाही, किंवा ते हे अपमान मुद्दामहून करत आहेत. आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चंदकांत पाटील ह्यांचा जाहीर निषेध करतो. चंद्रकांत पाटील ह्यांनी ताबडतोब आपले शब्द माघारी घेवून राष्ट्रपुरुषांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या घरा समोर आंदोलन करु आणि त्यांचा निषेध करू.

माझ्या बोलण्याचा विपर्यास – पाटील

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं. विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं पाटील म्हणाले आहे. पाटील म्हणाले की, झाडाला आंबे लागले की, लोक दगड मारतात. मी पहिलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांना ॲप्रिशियट करतोय. शाळा कोणी सुरू केल्या. हे मी सांगितलं. मी सांगण्याशिवाय तुम्ही लाइव्ह पाहा. मी आदरच व्यक्त केलाय. ते सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, दारोदार भीक मागितली म्हणजे आताच्या शब्दांत वर्गणी म्हणू. सीएसआर म्हणू. मात्र, तेव्हा भीक मागितली म्हणायचे. सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता, असे माझे म्हणणे होते. मात्र, प्रत्येक गोष्टीवरून वाद निर्माण करण्याचे सुरू आहे, असा उलट आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

भाजपाच्या लोकांकडून महापुरुषांचा वारंवार अपमान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद मध्येच दोनवेळा शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.

त्यानंतर भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितल्याचं हिंदी वृत्तवाहिनीवर म्हटलं होतं.

आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं विधान केलं होतं.

इतिहासाची ही मोडतोड चित्रपटांच्या माध्यमातूनही सुरु आहे. त्यामुळेच हर हर महादेव चित्रपटाविरोधात छत्रपतींचे वंशज माजी खासदार संभाजी राजे आक्रमक झाले. राष्ट्रवादी ने चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला.  एवढा विरोध होऊनही भाजपाने या सर्व नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम केल आहे.

तेव्हा चंद्रकांत पाटील यांना सरकार आणि भाजपातील वरिष्ठ नेते काही वेगळा न्याय लावतील का, हे पहावं लागेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!