ताज्या घडामोडी

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे…* *येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाची फेर निविदा प्रसिद्ध

*छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे…*

*येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाची फेर निविदा प्रसिद्ध*

*नाशिक,येवला,दि.२० जून :-* माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली असून बहुप्रतिक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ लक्ष रकमेच्या या कामाला दि. २१ जाने २०२१ रोजी जलसंधारण महामंडळाकडून मंजुरी मिळवली होती. त्यानंतर दि.५ फेब्रु २०२१ ला जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता यांनी ८ कोटी ९५ लाख किमतीला तांत्रिक मान्यता दिली. कोविड आल्यामुळे कोविडमधील अर्थिक निर्बंधांमुळे सर्व कामे स्थगित झाली होती.

कोविड संपल्यानंतर या कामावरील स्थगिती उठावण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये तीन निविदाधरकांनी निविदा भरल्या. ही निविदा मा. मुख्यमंत्र्यांच्या समितीकडे मंजुरीसाठी गेली. सदर योजना ही फॉरेस्ट एरियात असल्यामुळे निविदा मंजुरीनंतर तिन्ही निविदा धारकांनी काम करण्यासाठी नकार कळवला. या कामाची फेरनिविदा काढण्यासाठी छगन भुजबळ यांचा जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. फेरनिविदेसाठी पाठपुरावा करण्यात आल्यामुळे कालच या योजनेची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंत्राटदाराला हे काम मिळण्यानंतर कंत्राटदाराने पाठपुरावा करून फॉरेस्ट क्लिअरन्स करण्याचे बंधन या कामाच्या अटीशर्तींमध्ये आहे.
त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदाराच्या पाठपुराव्यामुळे फॉरेस्ट क्लिअरन्स चे काम होणार आहे.

सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून विविध योजनांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यापैकी येवला तालुक्यातील महत्वपूर्ण योजना असलेल्या देवना साठवण तलाव योजनेसाठी छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

देवना साठवण तलाव ही येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून येवला तालुक्यातील देवदरी,खरवंडी,राहडी,कोळम खु.,या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच,वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २.०८ दलघमी (७३.४४दलघफू) पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३.०० हेक्टर व येवला तालुक्यातील ४४.०० हेक्टर अशी एकूण ५७.०० हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे. त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खाजगी आहे. या योजनेची एकूण किंमत १२ कोटी ७७ लक्ष असून योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन फॉरेस्ट क्लिअरन्स नंतर या कामाला सुरुवात होणार आहे.

*ममदापूर येथील मेळाचा बंधाऱ्याचा प्रस्ताव टप्पा २ च्या अंतिम परवानगीसाठी वन विभागाकडे प्रस्तावित*

येवला तालुक्यातील ममदापूर परिसरातील साठवण तलाव ममदापूर या प्रकल्पाला वनविभागाकडून सप्टेंबर २०२२ मध्ये टप्पा एकची परवानगी प्राप्त झाली असून टप्पा २ च्या अंतीम परवानगीसाठी वन विभागाच्या नागपुर येथील कार्यालयाला प्रस्ताव गेलेला आहे.

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा सतत दुष्काळग्रस्त असल्याने याठिकाणची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून ममदापूर येथे रु ६४५.६४ लक्ष इतक्या रकमेच्या मेळाचा बंधारा या साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.तसेच या कामाचा कार्यारंभ आदेश देखील देण्यात आलेला होता.
मात्र हा प्रकल्प ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी हे काम सुरु होऊ शकले नव्हते.

राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची मान्यता,केंद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाची मान्यता आदी विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते.दि २३ मे २०२२ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला दि ६ मे २०२२ मधील मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून मान्यता दिली होती.त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकारप्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत या समितीने ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

साठवण तलाव ममदापूर हा २८.०६ हेक्टर वनजमिनीवर होणार आहे.या तलावाचे १८ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे. या बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील १७६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या साठवण तलावाचा ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांना सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!