ताज्या घडामोडी

राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचे, विविध जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?

*🟥राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचे, विविध जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?*
कागल प्रतिनिधी
अजिंक्य जाधव
———
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागनं विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट, यलो अ‍ॅलर्ट जारी केले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार, कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आले आहेत. यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात पावसानं पुरेशा प्रमाणात हजेरी लावलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह सर्वांना सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा होती. आज भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र विभाग मुंबई यांच्या वतीनं पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच १६ ते २० सप्टेंबरच्या काळातील पावसाचे इशारे जारी केले आहेत.
आज उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट
आजच्या दिवशी हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. या अ‍ॅलर्टनुसार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसची शक्यता आहे.
१७ सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?
भारतीय हवामान विभागानं उद्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. तर, नंदुरबार, नाशिक, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांसह धुळे आणि जळगाव मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.दरम्यान, हवामान विभागानं मुंबईला १६ ते १८ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी यलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. १८ सप्टेंबरला राज्यात मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, याच दिवशी रत्नागिरीला यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं रत्नागिरी जोरदार पावसाची शक्यता आहे. १९ आणि २० सप्टेंबरला राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर,या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!