ताज्या घडामोडी

पुढचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा, धो-धो बरसणार, मान्सूनबाबत मोठी अपडेट – मुंबईमध्ये

Mumbai Weather Forecast: पुढचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा, धो-धो बरसणार, मान्सूनबाबत मोठी अपडेट
कागल प्रतिनिधी
अजिंक्य जाधव
मुंबई: मुंबईमध्ये यंदा मान्सूनपूर्व पावसाचा अनुभव नव्हता. मुंबई शहरामध्ये १ जूनपासून २१.१ तर उपनगरांमध्ये १७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत शहरामध्ये एकूण ३३१.६ आणि उपनगरांमध्ये एकूण ३२७.२ मिलीमीटर पडतो. मात्र, येत्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने मुंबईमध्ये पुढचा आठवडा पावसाळी अनुभवाचा असेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
मोठ्या खंडानंतर मान्सूनचे पुनरागमन होताना मुंबईकरांना पावसाच्या माऱ्यासाठी तयार राहण्याची सूचना देणारा एक संदेश सोशल मीडियावर या काळात प्रसारित झाला आहे. तीन ते चार दिवसांमध्ये जूनच्या पावसाचा सरासरी आकडा गाठला जाईल इतका पाऊस या काळात पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. २६ जूननंतर अती मुसळधार म्हणजे ११५ ते २०४ मिलीमीटर दरम्यान पाऊस पडू शकेल असाही इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी मुंबईमध्ये घाबरून जाण्याइतका पाऊस पडेल अशी शक्यता बुधवारी २१ जूनला तरी दिसत नसल्याचे स्पष्ट केले. अशा संदेशांमुळे लोक घाबरून जातात. मुंबईमध्ये पुढील आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस पडू शकेल. १०० मिलीमीटरपर्यंत जरी पाऊस पडला तरी मुंबईसाठी आनंदाची बाब असेल. मुंबईमध्ये १०० मिलीमीटरपर्यंत पडलेला पाऊस हा मुंबईकरांच्या सवयीचा पाऊस आहे, त्यामुळे मुंबईकरांनी अशा वायरल संदेशांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही असेही त्या म्हणाल्या. मुंबईत यंदाच्या पावसाळ्यामध्ये आत्तापर्यंत पडलेला पाऊस पाहता मुंबईलाही पावसाची गरज आहे.
बुधवारी मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा कुलाबा येथे ३५ अंशांपर्यंत पोहोचला तर सांताक्रूझ येथे ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमानही कुलाबा येथे २८ तर सांताक्रूझ येथे २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. या चढ्या तापमानामुळे मुंबईकरांना असह्य उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा प्रती दिन लांबत चालल्याचे चित्र आहे. केवळ मुंबईच नाही तर महामुंबई परिसरातही हीच स्थिती आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ९० टक्के तर पालघर जिल्ह्यामध्ये ७७ टक्के पावसाची तूट आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!