ताज्या घडामोडी

नाशिक पोलीस आयुक्तालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती कार्यक्रम संपन्न*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*नाशिक पोलीस आयुक्तालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती कार्यक्रम संपन्न*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक- दि. २८/०५/२०२१ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असल्याने मा.पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रांगणात मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयामधील भगुर या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव दामोदर विनायक सावरकर, आईचे नाव राधाबाई दामोदर सावरकर असे होते. विनायक दामोदर सावरकरांना बाबाराव हे मोठे व नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकर हे अवघे नऊ वर्षाचे असतांना त्यांच्या आईचे निधन झाले. थोरल्या बंधुंच्या पत्नी श्रीमती येसुबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडीलांचे निधन इ.स. १८९९ मध्ये त्यावेळी पसरलेल्या प्लेगच्या साथीने झाले होते.

सावरकर हे स्वातंत्र्य लढयातील चळवळीचे धुरीण क्रांतीकारक, भारतीय राजकारणातील महत्वाचे राजकारणी, हिंदु संघटक, जातिभेदाचा विरोध करणारे सामाजिक तिकारक, प्रतिभावंत, साहित्यीक प्रचारक भाषा आणि लिपी शुध्दीचे प्रणेते, मराठी कवी व लेखक होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिध्द मराठी लेखक आणि पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुध्दीचे होते. वक्तृत्व, काव्यरचनेवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. त्यांची लेखणी आणि जिव्हा प्रखर चालत असे. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी स्वदेशी फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र रचना केली. चाफेकर बंधुंना फाशी दिल्याचे कळताच लहानग्या सावरकरांनी आपल्या कुलदेवी समोर “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र कांतीचा केतू उभारून मारता मारता मरे पर्यंत झुंजेन” अशी शपथ घेतली.

मार्च इ.स. १९०१ मध्ये त्यांचा विवाह यमुनाबाईशी झाला. त्यांना चार अपत्ये झाली. प्रभाकर प्रभा, शालिनी, आणि विश्वास. इ.स. १९०२ साली लग्नानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

• सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कपडयांची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेली शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर इ.स. १९०६ साली सावरकर हे कायदयाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात लंडनला गेले. लंडनमध्ये इंडिया हाऊस येथे वास्तव्यास असतांना त्यांनी जोसेफ मॅझिनींच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. याची प्रस्तावना करतांना त्यांनी सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान विशद केले होते. लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे कांतीपर्व सुरू झाले. इ.स. १८५७ चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुध्द होते. असे प्रतिपादन

करणारा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ सावरकरांनी लिहीला. सावरकर यांचे थोरले बंधु बाबाराव सावरकरांना राजद्रोहावर लिखाणासाठीच्या आरोपावरून काळयापाण्याची शिक्षा दिली. या गोष्टीवर संतापुन मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली या ब्रिटीश अधिका-याची हत्या केली. या हत्येमध्ये ज्या पिस्तुलाचा वापर होता ते सावरकरांनी पाठविले होते असे कळल्यावर ब्रिटीश सरकारने सावरकर यांना अटक केली. त्यांना समुद्राच्या वाटेने भारतात आणतांना त्यांनी फान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारून पोहत पोहत फ्रान्सचा समुद्री किनारा गाठला. तेथुन त्यांना अटक करून परत भारतात आणले. सावरकरांवर खटला चालवुन त्यांना जन्मठेपेची काळयापाण्याची शिक्षा देण्यात आली व अंदमानच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. अंदमानातुन सुटल्यावर त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द केले. त्यांनी हिंदू समाजाला संघटीत करण्यासाठी रत्नागिरीत कार्य केले. ज्यात सर्वांसाठी ‘पतीत पावन मंदिर’ सुरू केले, अस्पृशांसाठी मंदिर प्रवेश, आंतरजातीय विवाह लावले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील विशेष गुण म्हणजे ते फक्त विचार करून थांबत नव्हते तर कृतीतुन करून दाखवायचे. सावरकरांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहीले होते की “माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावे, जुन्या पध्दतीने माणसांनी खांद्यावर नेऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीवरून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतुनच विद्युत स्मशानात न्यावे.” माझ्या मृत्युनिमीत्त कोणीही आपले दुकान किंवा व्यवसाय बंद ठेवु नये. अशाने समाजाला फार त्रास होतो. संसारासाठी लागणा-या वस्तु न मिळाल्याने त्रास होतो. माझ्या निधनाचे कोणतेही सुतक, विटाळ ज्याने कुटुंबियांना त्रास होतो अशा रूढी पाळु नये. पिंडदान, काकस्पर्श सारख्या कालबाहय गोष्टी पाळु नये. अशा या महान स्वातंत्र्यवीराचे निधन २६ फेब्रुवारी १९६६ रोजी दादर या ठिकाणी झाले.

मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच वपोनि श्री. महेंद्र चव्हाण, पोलीस कल्याण विभाग यांनी सूत्रसंचालन केले. मपोअं/ अनिता जाधव, नेम नियंत्रण कक्ष, नाशिक शहर व श्री. संजय उगले, प्रमुख लिपीक, आस्थापना शाखा, नाशिक शहर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कर्तव्य गाथा उपस्थित अधिकारी / अंमलदार यांना वाचवून दाखविली. तसेच वपोनि / श्री. आनंदा वाघ, नेम-गुन्हे शाखा युनिट ०१ व वपोनि / श्री. सिताराम कोल्हे, मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती कार्यक्रमास श्री. दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्री. संजय बारकुंड, उपआयुक्त (गुन्हे), श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रींगी, उपआयुक्त (मुख्यालय), श्री. वसंत मधुकर मोरे, सपोआ (प्रशासन), श्री. सिताराम गायकवाड, सपोआ (श.वा. शाखा) तसेच २० पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस अंमलदार / मंत्रालयीन स्टाफ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close