ताज्या घडामोडी

आदिवासींच्या गावठाण जमिनीचा प्रश्न ऐरणीवर ?

घरकुले मंजूर होऊनही जागाच नसल्याने लाभापासून वंचित ;

आदिवासींच्या गावठाण जमिनीचा प्रश्न ऐरणीवर ?

घरकुले मंजूर होऊनही जागाच नसल्याने लाभापासून वंचित ;

गावठाण जमीन खरेदीसाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत तालुक्यातील आदिवासींच्या गावठाण आणि स्मशान वाटा याकरिता वाड्यालगतच्या खाजगी मालकीच्या जागा खरेदीसाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर पादीर यांनी महसूल विभागाकडे केली आहे
कर्जत तालुक्यात आदिवासी ,ठाकूर आणि कातकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे . पूर्वी पासून ते ज्या वाड्या पाड्यांमध्ये राहतात त्या वाड्या पाड्यांच्या जागांची मोजणी स्वात्रंत्र्य पूर्व काळात झालेली आहे . तेव्हा आदिवासींच्या त्या त्या वाड्या पाड्यातील लोकसंख्या कमी तथा मर्यादित होती . त्यामुळे त्या वाड्यांतील तेवढीच जागा आदिवासींची गावठाण म्हणून नोंद आहे . मात्र कालांतराने त्यांच्याही लोकसंख्येत वाढ झाल्याने तसेच विभक्त कुटूंब पद्धतीने शिरकाव केल्याने या आदिवासींनी हक्काची गावठाण जागा कमी पडू लागली आणि त्यांनी नाईलाजाने मागील काळात त्यांच्या वाड्ड्या लगतच्या खाजगी मोकळ्या जागांवर पक्की घरे बांधली . साहजिकच ती गावठाणात मोडत नाहीत . त्यावेळी या जंगल परिसरातील जमिनीला फारसा भाव नसल्याने या पडीक जमिनीकडे मालकही फारसे लक्ष देत नव्हते . मात्र आता फार्महाउस , प्लॉटिंग व्यवसायामुळे मुळे या जमिनींना सोन्याचा भाव आल्याने संबंधित खाजगी जमीन मालकांनी आपल्या खाजगी मालकीच्या जागेतून आदिवासींना हटविण्यास सुरवात केली आहे . यामुळे जमीन मालक आणि आदिवासी यांच्यात संघर्ष वाढत आहे . पोलीस ठाणे ,कोर्ट कचेरी प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तसेच  घरकुल मंजूर झाले तरी हक्काची गावठाण जागा संपुष्ठात आल्याने नवीन घरकुल बांधायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे आदिवासींना या घरांचा लाभा पासून वंचित राहावे लागत आहे .

तरी या समस्येतून आदिवासी बांधवांची सुटका करण्यासाठी महसूल विभागाने धोरणात्मक निर्णय घेऊन या खाजगी मालमत्ता आदिवासींच्या गावठाण क्षेत्रासाठी ,स्मशानवटा साठी धोरणात्मक निर्णय घेऊन खरेदी कराव्या अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पादीर  यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे .
———————————————————-

प्रतिक्रिया :

स्वात्रंत्य् पूर्व काळात त्या वेळच्या आदिवासींच्या लोकसंख्येच्या तथा घरांच्या संख्येप्रमाणे वाड्यांमध्ये  गावठाण जागांची नोंद केली गेली . त्यानंतर आज पर्यंत एवढ्या वर्षात या लोकसंख्येत भरपूर वाढ झाली आहे . परिणामी नवीन घरे तसेच मंजूर घरकुले बांधण्यासाठी या वाड्यातील आदिवासी बांधवांकडे हक्काची गावठाण जागाच नाही . त्यांच्या वाडयांना लागून खाजगी मालकांच्या जमिनी आहेत . त्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या खाजगी मालकांच्या जागा आदिवासींच्या गावठाण आणि स्मशानवटसाठी गरजेनुसार खरेदी कराव्यात आणि आदिवासींच्या गावठाण जागेचा प्रश्न सोडवावा .
—- मनोहर पादीर , अध्यक्ष – आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ
————————————————————————-

चौकटीतील मजकूर …

स्मशान वटाचाही प्रश्न गंभीर ….

आदिवासींमध्ये मृतदेहाचे दफन करण्यात येते . त्या जागेला ते स्मशानवटा म्हणतात . यातील बऱ्याच स्मशान वटा या खाजगी मालकीच्या जागेत असल्याने आता या जमीन मालकांनी दफन करण्यास परवानगी नाकारली आहे . जमीन रीतसर नावावर असल्याने प्रशासनही जमीन मालकावर कारवाई करू शकत नाही . अशा परिस्थितीत पारंपरिक दफन जागा नाकारल्याने मृतदेह दफन करायचे तरी कुठे असा नवीन प्रश्न या आदिवासींना सतावत आहे .
—————————————————————————————————–

घरकुलाच्या जागांच्या समस्या असलेल्या कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांची नावे …

ताडवाडी ,शिलार वाडी ,लोभेवाडी ,आनंद वाडी ,मोगरज ,चौधर वाडी ,झुगरेवाडी ,बांगरवाडी आदी .
—————————————-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close