ताज्या घडामोडी

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूचना झुगारून भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरूच …. पोही येथील शेतकऱ्यांची हरकत

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूचना झुगारून भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरूच ….
पोही येथील शेतकऱ्यांची हरकत

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायत हद्दी मध्ये असलेल्या
एक्झर्बिया कंपनीच्या दोन मोठ्या गृहसंकुल प्रकल्पासाठी भूमीगत वीज वाहून नेणाऱ्या केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पोही पासून वारे पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने ही केबल टाकली जाणार होती,मात्र कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याच्या अभियंत्यांनी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून केबल टाकण्यास रस्ते विकास महामंडळकडून विरोध करण्यात आला होता, असे असतांना ही वारे ते पोही दरम्यान ठेकेदारांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू ठेवले आहे.
एक्झर्बिया कंपनी तालुक्यातील वरई आणि अवसरे या ठिकाणी मोठे गृह प्रकल्प साकारले जात आहेत.त्या ठिकाणी हजारोच्या संख्येत सदनिका असणार आहेत, त्यामुळे त्या सर्व घरांना वीज मिळावी यासाठी वारे येथे असलेल्या वीज उपकेंद्रातून वीज वाहिनी नेण्यासाठी महावितरण कंपनीला ठराविक रक्कम भरली.त्यानंतर वारे येथून पोही पर्यंत कर्जत-मुरबाड रस्त्याने आणि नंतर पोही पासून अवसरे पर्यंत वीज नेण्याचे काम महावितरण कंपनीने मंजूर केले होते.2019 मध्ये वारे येथून विजेचे खांब उभे करून वीज एक्झर्बिया कंपनीच्या गृहप्रकल्प पर्यंत नेली जात होती.मात्र पोशिर गावातील ग्रामस्थांनी विजेचे खांब टाकण्यास विरोध करून रस्त्याच्या कडेला उभे केलेले विजेचे खांब काढून टाकण्यास भाग पाडले.नंतर संबंधित कंपनीने त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेने जमीन खोदून केबल टाकून वीज वाहिनी नेण्याचे काम सुरू केले.अजूनही पोशिर ग्रामस्थ आपल्या जागेतून केबल टाकू देत नाहीत.त्यामुळे केबल टाकण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने पोही पासून वारे येथील वीज उपकेंद्र पर्यंत केबल टाकण्याचे काम 7 फेब्रुवारी पासून सुरू केले होते.
राज्य मार्गच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे खोदकाम करून वीज वाहून नेणारी केबल टाकता येत नाही.परंतु नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला केबल टाकली गेली.तसाच प्रकार आपण कर्जत-मुरबाड रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून केबल टाकून नेऊ शकतो असा विश्वास केबल टाकण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला असल्याने केबल टाकण्यास सुरुवात केली होती.
मात्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमआरडीसी यांच्या अभियंत्यांनी रस्त्याला बाजूला केबल टाकण्यास विरोध करून काम बंद पाडले आहे.सदर रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतरावर खोदकाम करून केबल टाकण्यात यावी अशी सूचना राज्य रस्ते वाहतूक विकास महामंडळ यांचे साईट इंजिनिअर यांनी दिली आहे.पोही येथे आरसीसी रस्त्याच्या बाजूला काढण्यात आलेल्या गटारातून केबल टाकली जात आहे.ते गटार पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी बांधले आहे.मात्र त्या गटारात केबल टाकून पाण्याचा मार्ग बंद करण्याचा केबल टाकणाऱ्या ठेकेदाराला प्रयत्न आहे.दरम्यान,या बाबत राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे उपअभियंता सीमा पाटील यांनी देखील आपल्या कडे असलेल्या रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर पर्यंत कोणतेही बांधकाम अथवा खोदकाम करू नये असे आदेश दिले आहेत तरी देखील वारे ते पोही दरम्यान ठेकेदारांनी काम सुरूच ठेवल्याने आजूबाजूला असलेले शेतकरी पोही गावाच्या शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेत जमिनीत मुख्य वीज वाहून नेणारी केबल टाकण्यास विरोध करीत आहेत,

चौकट:
22 केव्ही या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या टाकण्या साठी काही सुरक्षेच्या दृष्टीने नियम पाळून काम करण्याचा सूचना देऊन कामास संबंधीत विभागा कडून परवानगी देण्यात आली आहे,मात्र प्रत्यक्ष जागेवर नियमबाह्य काम होत असल्याचे निदर्शनास येते, सदर चे काम करतांना खालील अटी शर्थीचे पालन करणे ठेकेदारास बंधनकारक आहे ,

# रस्त्याखालून इलेक्ट्रीकल केबल टाकण्याचे कामास सुरुवात करणेपूर्वी कामाच्या ठिकाणापासून दोन्ही दिशेला १०० मि . अंतरावर सावधानतेच्या इशाऱ्याचे फलक रिपलेक्टोव स्टीपचा वापर करुन लावण्यात यावेत
# रात्रीच्या वेळी काम सुरु अथवा अपूर्ण राहिल्यास माहितगार तत्रांसह रात्रभर तेवत राहणारा लाल प्रकाशझोताचा दिवा लावण्याची व्यवस्था कंपनीने करावी .
# रस्त्याचा पृष्ठभाग इलेक्ट्रीकल केबल टाकणेसाठी खोदला असता , मोकळा होऊन पोकळी निर्माण झालेल्या इलेक्ट्रीकल केबल टाकलेल्या लाईन व्यतिरिक्त इतर सर्व भागामध्ये संबंधित कंपनीने स्वखर्चाने सिमेंट काँक्रीट करणे # भूमीगत रस्त्याच्या उजव्या बाजूने इलेक्ट्रीकल केबल लाईन व पोल रस्त्याच्या मध्यापासून कमीत कमी १५ मीटर अंतरावर टाकण्यात यावा.
रा.मा. १० ९ व्या शासकीय मूलप्त जागेच्या अथवा इतर खालील भालकीच्या जमीनीतून इलेक्ट्रीकल केबल टाकावयाची झाल्यास संबंधीतांची अर्जदाराने परवानगी घेणे आवश्यक आहे .
# खोदकाम चालू असताना रस्त्याच्या कडेची झाडे तोडणे अनिवार्य असल्यास अभिकर्ता कंपनीने संबंधीत सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी मिळवावी .
# इलेक्ट्रीकल केबल रस्त्याच्या पृष्ठ भागापासून १.६५ मि . जमिनी खाली टाकण्यात यावी ,
# संबंधित क्षेत्राच्या क्षेत्रिय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली काम सुरु करावयाचे आहे, इत्यादी महत्वाच्या अटी शर्थी चे पालन करणे आवश्यक असतांनाही ठेकेदारांनी प्रत्यक्षात काम सुरू करतांना काही ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन केलेले दिसून येत नाही.

प्रतिक्रिया :-
दिनेश भोईर (ग्रामस्थ पोही )
पोही ते वारे दरम्यान एक्सब्रिया कंपनी साठी जी भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे ,त्यात आमच्या शेतकऱ्यांच्या जागेतून खोदकाम सुरू आहे ,कोणत्याही शेतकऱ्यांना न विचारता पोलिसबंदोबस्तात दंडुकशाहित काम सुरू असून काम करतांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितते काळजी घेतली जात नाही .

प्रतिक्रिया :-
सीमा पाटील-उपअभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ
आम्ही आमच्या मालकीच्या रस्त्याच्या आजूबाजूला कोणतेही नवीन अतिक्रमण अथवा खोदकाम होणार नाही याची काळजी घेत आहोत.जे नियम आहेत त्या नियमांचा आधार घेऊन रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतरावर खोदकाम करून केबल टाकण्यास सुचविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close