ताज्या घडामोडी

नाशिक 151’ म्हणजे नाशिककरांनी नाशिकसाठी केलेला महोत्सव: जिल्हाधिकारी सूरज मांढरे* . ‌ ‌. *1 मे 2021 ते मे 2022 पर्यंत असेल नाशिक 151 चा महोत्सव;*

*नाशिक 151’ म्हणजे नाशिककरांनी नाशिकसाठी केलेला महोत्सव: जिल्हाधिकारी सूरज मांढरे*
. ‌ ‌. *1 मे 2021 ते मे 2022 पर्यंत असेल नाशिक 151 चा महोत्सव;*
नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे नाशिक जिल्ह्याला 150 वर्षेपूणे होण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याची शक्तीस्थळे जगासमोर आणण्याच्या हेतूने नाशिककरांनी नाशिकसाठी शासनाच्या मदतीने केलेला महोत्सव म्हणजेच ‘नाशिक 151’ आहे. हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी देखील नाशिककरांचीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिक 151’ कार्यक्रम नियोजनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नितीन मुंडावरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जाणकार व मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

*वर्षभर सुरू राहणार नाशिक 151 चा महोत्सव*
नाशिक 151 कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले की, नाशिक 151 या कार्यक्रमांची सुरूवात 1 मे 2021 पासून सुरू होणार असून पुढील वर्षीच्या 1 मे 2022 पर्यंतच्या कालावधीत नाशिक जिल्ह्याची ओळख सांगणारे विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.

वर्षभर सुरू राहणाऱ्या या महोत्सवाच्या नियोजनासाठी माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मुख्य मध्यवर्ती समिती गठीत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कालावधीत नाशिक 151 या महोत्सवात वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहिर करण्यात येणार असल्याने विविध क्षेत्रातील सर्व जाणकार व्यक्तिंनी एकत्र येवून नियोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बैठकीत केले.

तसेच नाशिक 151 या महोत्सवासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनामार्फत 25 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी त्यांचे आभार मानले.

*तीन टप्प्यात होणार महोत्सवाचे आयोजन*

अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सुरू करणे तसेच नाशिक जिल्ह्याची ओळख सांगणारे संगीत, क्रीडा, पर्यटन, शेती, साहित्य अशा विविध क्षेत्रातील महोत्सव साजरे करणे अशा तीन टप्प्यात नाशिक 151 या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा समावेश असणाऱ्या समित्या असणे आवश्यक असल्याने त्याअनुषंगाने याबैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्याचा इतिहास त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वेगवेगळया भागातील अनेकविध कला, संस्कृती, शेती, उद्योग, चित्रपट, संगीत, लोककला यांना एक व्यासपीठ मिळण्याच्या उद्देशाने कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तयार करणे, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून ते प्रकल्प शाश्वत स्वरूपात विकासीत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना याबैठकीत मांडण्यात आल्या आहेत.

नाशिक 151 हा कालमर्यादीत महोत्सव असल्याने याबाबत फक्त चर्चा करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित व जाणकारांनी पुढाकार घेवून नाशिक 151 महोत्सव यशस्वी करण्याच्या दृष्टिने या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत उपस्थित सर्वांना आवाहन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close