ताज्या घडामोडी

पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासन – श्रमजीवी संघटना समन्वय बैठक

सुहास पांचाळ नवि मुंबई :-

पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासन – श्रमजीवी संघटना समन्वय बैठक

भिवंडी तालुक्यातील पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि पंचायत समिती प्रशासन, ग्रामसेवक अशी संयुक्त बैठक पार पडली. पंचायत समिती भिवंडी सभागृहात झालेली बैठक तब्बल 4 तास चालली. यावेळी तालुक्यातील पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करून एक सक्षम ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन केले. तालुक्यातील तब्बल 24 ग्रामपंचायतींमध्ये 68 ठिकाणी असलेल्या योजना ग्रामपंचायत प्रशासनाला फाटा देत काही खाजगी लोक चालवतात याबाबत श्रमजीवी संघटनेने आढावा घेत बेकायदेशीर कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेत सर्व ग्रामपंचायतीन आदेश पारित करत तातडीने या योजना ताब्यात घेण्याबाबत निर्देश दिले.यापुढे अशी बेकायदा वसुली झाल्यास नियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी भूमिका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे यांनी घेतली.

तालुक्यातील आदिवासी गाव पाडे आजही तहानलेले आहेत. भिवंडी शहराच्या जवळ असलेल्या काटई, खोनी,निंबवली इत्यादी ग्रामपंचायतितही आदिवासी ,कातकरी पाड्यावर टंचाई आहे. यासह योग्य नियोजनाच्या अभावामुळे अनेक योजना बंद पडल्या आहेत,अनेक ठिकाणी वीज बिल थकबाकीमुळे योजना बंद आहेत. याबाबत श्रमजीवी संघटनेने आंदोलन केले होते, या पार्श्वभूमीवर आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामसेवकांनी यावेळी आपल्या अडचणी मांडल्या, श्रमजीवीच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी यावेळी गावातील पाणी टंचाईचे वास्तव मांडले. अत्यंत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात या टंचाईवर मात करण्यात यश मिळेल अशी आशा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
पेसा आणि वित्त आयोगाचा निधी या वर्षी प्राधान्याने केवळ पाण्यासाठीच वापरावा अशी मागणी यावेळी श्रमजीवी संघटनेने केली, त्यानुसार गट विकास अधिकारी यांनी हा निधी पाण्यासाठी वापरण्याबाबत निर्देश दिले. यासह पाणी टंचाई संबंधित अनेक विषयांवर यावेळी तपशीलवार चर्चा झाली.

अनेक सधन ग्रामपंचायती मध्ये अनेक उद्योग व्यवसाय आहेत,केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता, त्या योजनांची वाट पाहत गरीब आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवण्यापेक्षा असे व्यावसायिक, देणगीदार आणि ग्रामपंचायत मूळ फंड अशातून लघु नळ पाणीपुरवठा योजना करण्याबत नियोजन करावे असे आवाहन यावेळी श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांनी केली.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत म्हणजे 2022 पर्यंत तरी आपल्या भिवंडी तालुक्यातील सर्वच आदिवासी पाडे टंचाई मुक्त ,टँकर मुक्त होतील यासाठी श्रमजीवी संघटना आग्रही राहील, प्रशासनाने या दृष्टीने काम करावे असे यावेळी सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे, पाणी पुरवठा उपअभियंता कांबळे ,सुदेश भास्कर, श्री सासे यांच्यासह श्रमजीवी संघटना सरचिटणीस बाळाराम भोईर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार, जया पारधी,संगीता भोमटे,कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, तालुका अध्यक्ष ग्रामीण सुनील लोणे, शहर अध्यक्ष सागर देसक, सचिव आशा भोईर, मोतीराम नामकुडा, तालुका उपाध्यक्ष नारायण जोशी,तानाजी लाहंगे, दुषांत घायवाट,प्रदीप चौधरी,किशोर हुमने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close