ताज्या घडामोडी

पारंपरिक सरी वरंबा पद्धतीला छेद देत प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास चांगले उत्पन्न ;

तणांच्या प्रादुर्भावापासुन सुटका ,मजुरी व पाण्याचीही बचत ; कर्जत तालुक्यात यशस्वी प्रयोग

पारंपरिक सरी वरंबा पद्धतीला छेद देत प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास चांगले उत्पन्न ;

तणांच्या प्रादुर्भावापासुन सुटका ,मजुरी व पाण्याचीही बचत ;

कर्जत तालुक्यात यशस्वी प्रयोग

 कर्जत : विजय डेरवणकर

शेती परवडत नाही असे म्हणत वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचा नकारात्मक विचार करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी पारंपरिक सरी वरंबा पद्धतीला छेद देत आधुनिकतेची कास धरत प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून गादी वाफे करून त्यास ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते हे दिसून आले आहे . या पद्धतीचा अवलंब केल्यास कमी पाणी ,तण  उगवण्याची समस्या नाही त्यामुळे मजुरांची गरज नाही . साहजिकच यामुळे कमी पैशात दर्जेदार हवे ते उत्पन्न शेतकऱ्यांना घेता येईल हे कर्जत तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीतुन सिद्ध झाले आहे .

          हल्ली जिकडे बघावं तिकडे सध्या शेतीच्या उत्पनाच्या नावाने बोट मोडणारी शेतकरी दिसतात . शेती परवडत नाही ,चांगले उत्पन्न निघत नाही ,वाढती मजुरी ,मजूर मिळत नाहीत ,पाण्याची कमतरता अशी कारणे बहुतांश शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात . हे जरी काही अंशी खरे असले तरी यावरही मात करणे शक्य आहे .

    व्यावसायिक तत्वावर मोठ्या प्रमाणात अशी शेती करायची असल्यास टॅक्टरच्या साह्याने मागे अवजार जोडून रुंद गादी वाफे तयार करता येतात . प्लास्टिक मल्चिंगचा वापर केल्याने चांगले गादी वाफे तयार होऊन त्यात ठिबक सिंचनाने रोपांना आवश्यक तेवढेच पाणी देता येते . ठिबक सिंचनासाठी शासनाची योजना असून यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास टक्के सबसिडी आहे . याचाही फायदा शेतकऱ्यांना होतो . जे उत्पादन घ्यायचं आहे त्याच चांगलं वाण म्हणजेच बियाणं खरेदी केल्यास पीक चांगले येऊन फळधारणा चांगली दर्जेदार होते .

   कीटकांपासून बचाव करण्यासाठी आता नवीन पद्धतीचे पेपर सदृश्य चिकट सापळे ( ट्रॅप ) मिळतात . ज्या ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे अशा ठिकाणी ते लटकवल्यास कीटक त्या सापळ्याकडे आकर्षित होऊन चिकटतात . त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी फारशी करावी लागत नाही .

   तसेच फवारणी करायचीच झाल्यास रासायनिक कीटकनाशकांऐवजी पर्यावरण स्नेही निंबोळी अर्काचा वापर केल्यास पिकांना फायदेशीर असणाऱ्या मित्र किडींना हानी पोहोचत नाही . उदाहरण द्यायचे झाले तर मधमाश्या इतर मित्रकिडी निश्चिन्तपणे संचार करू शकतात त्यामुळे झाडांची फळधारणा होण्यास चांगली मदत होते तसेच प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची काही मोजकीच रोपे लावण्यात आली होती तोही प्रयोग यशस्वी होत स्ट्रॉबेरीची फळ आली अशी माहिती गौरकामतचे प्रयोगशील शेतकरी विनायक देशमुख यांनी दिली .
————————————————————-

चौकटीतील मजकूर …

          या अशा पद्धतीची आधुनिक शेती ग्रामीण भागातील घरासमोरील मोकळया आठ ,दहा  गुंठ्यात असणाऱ्या मोकळ्या शेतजमिनीत जरी केली ज्याला ग्रामीण भागात ज्याला परसबाग म्हणतात तेथेही अशा प्रकारे चांगले दर्जेदार उत्पन्न घेऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकतो . तसेच व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात काही एकरात अशा पद्धतीची आधुनिक शेती केल्यास मिळालेल्या उत्पनातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर निश्चितच उंचावेल .
————————————————————————–

प्रतिक्रिया :
प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्याने भरपूर चांगले उत्पादन मिळते . मी माझ्या शेतात काकडी ,फारस बी ,टोमॅटो ,सिमला मिरची आदी पिके घेतो . दर्जेदार फळ असल्याने चांगला भाव मिळतो . आता  आले लागवडीचाही प्रयोग करणार आहे . या अशा प्रकारच्या शेतीत पारंपरिक पिकांऐवजी ऐवजी वेगवेगळी पिके घेतात हे या शेतीचे वैशिट्ये आहेत .

— मोहन राणे ,प्रयोगशील शेतकरी ,गौरकामत
————————————–

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close