ताज्या घडामोडी

सर्वसामान्य नागरिकांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प – माजी खासदार समीर भुजबळ*

*सर्वसामान्य नागरिकांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प – माजी खासदार समीर भुजबळ*

नाशिक,दि.१ फेब्रुवारी :- कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता असतांना आज मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्पातून सर्व सामान्य नागरिकासाठी निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नाशिक माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, करसंरचनेत बदल होऊन मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र त्याबद्दल कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय न घेतल्याने मध्यमवर्गीय नागरिक नाराज झाले आहे. एकीकडे पेट्रोल डीझेलचे दर अधिक वाढले असतांना त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक होते. मात्र पेट्रोल आणि डीझेलवर अधिभार लावण्यात येत आहे. पेट्रोल डीझेलचे दर वाढले म्हणजे त्याचा परिमाण शेतीसह इतर सर्व क्षेत्रांना बसतो त्यातून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे.

नाशिक शहर व परिसराला जोडण्यासाठी नाशिक मेट्रोची संकल्पना आपण खासदार असतांना मांडलेली होती. यंदाच्या अर्थसंकल्पातून नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र ही मेट्रो आहे की टायर बेस मेट्रो आहे याचा यामध्ये कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. तसेच हा प्रकल्प कधी सुरु होणार याबाबत मात्र स्पष्टता दिसत नाही.त्यामुळे फक्त आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन हे नाशिककरांना दाखवलेले गाजर आहे.गेल्या वर्षीच्या बजेट मध्ये नाशिक पुणे रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याच्या कामालाही कुठेच गती अद्याप प्राप्त होत नसल्याचे सद्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिक मेट्रोचा प्रकल्प हा निवडणूक जुमला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच ‘जिंदगी साथ भी जिंदगी के बाद भी’ हे बिरूद मिरविणाऱ्या शासनाच्या मालकीच्या एलआयसीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय शासनाने गेल्या अर्थसंकल्पात केला आणि यंदाच्या अर्थसंकल्पात देखील एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार आहे. तसेच आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे म्हणजे घराचे वासे विकून घर चालविण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून दिसतो अशी टीका समीर भुजबळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या बजेट मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी कुठलीही विशेष तरतूद करण्यात आलेली बघावयास मिळत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद म्हणजे केवळ १.४ टक्के तरतूद यंदा करण्यात आलेली असल्याने संरक्षण क्षेत्राकडे सुद्धा दुर्लक्ष असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close