ताज्या घडामोडी

मुस्लिम समाजाच्या दुर्दशेला जबाबदार कोण ?* *काँग्रेसकडून समाजाची घोर निराशा, राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका.*

इक्बाल यांनी म्हटले आहे कि - *ना समझोगे तो मीट जाओगे ऐ हिंदी मुसलमानो,* *तुम्हारी दास्ताँ तक भी ना होगी दास्तानो मे .* --------------

*मुस्लिम समाजाच्या दुर्दशेला जबाबदार कोण ?*
*काँग्रेसकडून समाजाची घोर निराशा, राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका.*

  सौजन्य अल्ताफ शेख – संपादक

श्रीरामपूर – महाराष्ट्रातील दोन कोटी मुस्लीम समाजाची आज जी दैन्यावस्था झाली आहे त्याला येथील पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जबाबदार असून या दोन्ही पक्षांनी मुस्लिम समाजाची निराशा केली आहे. मुस्लिम समाजाने आजपर्यंत सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देऊन देखील दोन्ही पक्षांनी समाजाची घोर निराशा करून समाजाचे प्रश्न सोडविण्याऐवजी गुंतागुंतीचे करून ठेवले आहेत. सध्या या राज्यांमध्ये काँग्रेस हतबल आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे . आता मुस्लिम समाजानेच सारासार विचार करून समाजाच्या हितासाठी परंपरागत विचारसरणी बाजूला ठेवून पुन्हा नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका समोर ठेवून पुन्हा एकदा जातीयवादी राजकारण करण्याचे धोरण सत्ताधारी तीन पक्षाच्या आघाडीमधील एका पक्षाने घेतले आहे. शहरांची नावे बदलण्याचे षड्यंत्र हा त्याचा एक भाग आहे. याचा फायदा भाजप घेण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु या सर्व घडामोडींमध्ये सर्वात मोठे नुकसान मुस्लिम समाजाचे होणार आहे. मुस्लिम समाजाचे पुढारी फक्त आपल्या खुर्च्या टिकविण्यामध्ये मग्न आहेत. समाजाला राज्यपातळीवर भक्कम नेतृत्व नसल्याने त्याचा फायदा सर्वच पक्ष घेत आहेत. त्यामुळे समाजातील जाणकार, सुशिक्षित, समजूतदार व समाजाच्या प्रगतीची तळमळ असणाऱ्या लोकांनी आता एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी दुसऱ्याचे जोडे उचलण्यापेक्षा स्वतःची ताकत निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
भारतीय जनता पक्ष हा मुस्लिम समाजाचा शत्रू नंबर एक आहे हे कुठेही लपलेले नाही. 2014 साली सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने आपल्या पक्षातून एक ही मुस्लिम आमदार दिला नाही किंवा एकाही मुस्लिम नेत्याला विधानपरिषदेत निवडून आणून मंत्री केले नाही. मुस्लिम समाजाच्या हिताचे कोणतेच निर्णय सेना भाजप सरकारने त्या काळात घेतले नाही. शरद पवार हे आपले मुरब्बी नेते आहेत. त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधली खरी. परंतु त्यामुळे सेनेचे खरे रूपही बदललेले नाही.समान कार्यक्रमावर आधारित ही आघाडी आता आपले खरे रूप दाखवायला निघाली आहे. काँग्रेसचे सर्व पुढारी आता सत्तेपुढे लाचार झाले असून त्यांनी आता प्रखर विरोध करण्याऐवजी नमते धोरण घेतले आहे कारण त्यांना आपल्या खुर्च्या जाण्याची भीती वाटत आहे. 2014 पूर्वी राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने निवडणुकीला सामोरे जाताना मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देऊ केले हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही याची जाणीव त्यांना होती. परंतु समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला .आता विद्यमान सरकार सत्तेत येऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तत्परता दाखविणारे सरकार मुस्लिम आरक्षणाबाबत मात्र एक शब्दही काढायला तयार नाही. ही समाजाची शुद्ध फसवणूक आहे. उच्च न्यायालयाने देखील मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे असे आपल्या आदेशात बजावलेले असताना राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. उलट मुस्लिम समाजाशी निगडित किरकोळ प्रश्‍नांचा बाऊ करून समाजाचे लक्ष बेकार च्या यासारख्या गोष्टींमध्ये वळविण्याचे काम सध्या सुरू आहे. शहरांची नावे बदलून जर विकास होणार असेल तर ती जरूर करा. परंतु नावे बदलल्याने इतिहास मात्र बदलला जाणार नाही. हे सर्वांनीच लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे .
स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आज देशातील आणि राज्यातील मुस्लिम समाजाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्येपैकी 15 टक्के मुस्लिम समाज आहे .राज्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या दोन कोटीच्या आसपास आहे. परंतु समाजाचे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. राज्यात अल्पसंख्यांक विकास खाते नावाला आहे. या खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या सर्व योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. राजकीय दृष्ट्या मुस्लिम समाजाला अत्यंत हीन दर्जा दिला जात आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या चार मुस्लिम मंत्री असले तरी त्यांना समाजाशी काहीही देणेघेणे नाही. यापैकी दोन जण मुंबईचे आहेत. त्यांना उर्वरित महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाशी काहीही देणेघेणे नाही. एक मंत्री महोदय कोल्हापूरचे आहेत. ते समाजामुळे निवडून आलेले नाही, त्यामुळे ते सुद्धा मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर फार आग्रही नसतात. सिल्लोडचे एक मंत्री फक्त राजकीय सोय म्हणून एका पक्षाकडून मंत्री झालेले आहेत. ते सुद्धा समाजासाठी आजपर्यंत कोणतेही भरीव योगदान देऊ शकलेले नाही. समाजाच्या प्रश्नांची जाण असणारा माणूस मंत्रिमंडळात पाहिजे. ज्याप्रमाणे रामदास आठवले हे दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून वेळोवेळी आग्रही असतात. अशी आग्रही भूमिका मुस्लिम समाजाचा कोणताही मंत्री घेताना दिसत नाही हे खरे तर समाजाचे दुर्दैव आहे .
मुस्लिम समाजाची आज जी दशा झाली आहे त्याला प्रामुख्याने कॉंग्रेस पक्ष जबाबदार आहे. भाजप आणि सेनेने आजपर्यंत काँग्रेसला मुस्लिमधार्जिणे म्हणून हिनवले आणि त्यांच्या दबावापोटी काँग्रेसने मुस्लिमांच्या भल्याचे कोणतेही कार्य आजपर्यंत केल्याचे दिसत नाही. दलित, आदिवासी, भटक्या जमातींना ज्या सवलती दिल्या गेल्या आहेत. त्यांच्याही पेक्षा वाईट अवस्था मुस्लिम समाजाची झालेली असताना अशा सवलती या समाजाला देण्याची गरज आहे .परंतु या प्रश्नासाठी पाठपुरावा करणारी भक्कम फळी समाजात नसल्याने आज समाज फरफटत चालला आहे. सुशिक्षित घटकांपैकी अनेकजण हे स्वतःच्या विचारातच मशगुल आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम समाज आज खूपच दयनीय जीवन जगत आहे. यासाठी राजकीय पुढारी बाजूला ठेवून समाजातील प्रगतीची तळमळ असणाऱ्या लोकांनी आता एकत्र येण्याची व काम करण्याची आवश्यकता आहे. राजकीय दृष्ट्या मुस्लिम समाजाचे शोषण करण्याचेच प्रयत्न सातत्याने आजपर्यंत करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोकवस्ती आहे तो भाग जाणीवपूर्वक तोडून तेथून मुस्लिम समाजाचा लोकप्रतिनिधी निवडून येणार नाही असेच नियोजन प्रत्येक ठिकाणी केले जाते. त्यामुळे लोकसंख्या असूनही सदस्य संख्या मात्र कमी दिसून येते. जे मुस्लिम सदस्य ग्रामपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये निवडून येतात ते सुद्धा हे विसरून जातात कि आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून आलेलो आहोत. ते आपल्या पक्षाच्या नेत्याचा उदोउदो करण्यात धन्यता मानतात. स्वतःच्या सोयीसाठी इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारतात आणि आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने समाजासाठी प्रखरपणे सचोटीने निस्वार्थीपणे लढा देणारे नेतृत्व आजपर्यंत राज्यात निर्माण होऊ शकले नाही. एकमेव अब्दुल रहमान अंतुले साहेब यांच्या रुपाने नेतृत्व मिळाले होते. परंतु नगर जिल्ह्यातील एका मातब्बर पुढाऱ्याने त्यांना फसवून त्यांचे मुख्यमंत्रीपद घालवले आणि राज्यातील सर्वसामान्य लोकांचा एक नेता पुढे अनेक वर्ष कोर्टकचेऱ्या मध्येच रममाण राहिला . त्यामुळे त्यांचे उमेदीचे दिवस निघून गेले.
आज खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाची प्रगती होण्यासाठी काही वेगळी धोरणे घेण्याची गरज आहे. परंतु राज्य सरकार अशी धोरणे न घेता मुस्लिमांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी नको ते विषय पुढे आणीत आहेत. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी फक्त त्यांचा वापर केला जातो. दुर्दैवाने केंद्रातले प्रतिगामी विचाराचे सरकार हे मुस्लिमांचे शत्रू ठरले असून त्यांची धोरणे ही समाजाला तापदायक ठरणारी आहेत. त्यामुळे आता समाजाने खऱ्या अर्थाने जागरूक होणे आवश्यक आहे. समाजाने आता आपले लक्ष शिक्षणाकडे द्यावे. समाजातील अनेक अनिष्ट चालीरीती, प्रथा बंद करून फक्त शिक्षण या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उरूस, कव्वाली, कंदुरी, नियाज, लग्न समारंभात होणारी उधळपट्टी असल्या भाकड प्रथा बंद करून समाजाने आता फक्त शिक्षण हे ध्येय ठेवून आपल्या मुलांची प्रगती करण्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. धार्मिकतेच्या नावाखाली नको तिथे धर्माचे गड निर्माण होत आहेत. तेथेसुद्धा लगाम घालण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आता सर्वांनी अंग झाडून एक होण्याची आवश्यकता आहे. प्रसिद्धी, सत्तालोलुपता, मोठेपणा या सर्व बाबी आता बाजूला ठेवण्याची गरज आहे. समाजाच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाशी लढा उभारावा लागणार आहे. त्यासाठी आता आपण पुढे आले पाहिजे. कुणाचाही द्वेष न करता समाजाच्या प्रगतीसाठी, सर्वांचे सहकार्य मिळविणे आवश्यक आहे. समाजाची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय इतर प्रगती होऊ शकत नाही. त्यासाठी आता सर्वांनी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण अल्लामा इक्बाल यांनी म्हटले आहे कि –
*ना समझोगे तो मीट जाओगे ऐ हिंदी मुसलमानो,*

*तुम्हारी दास्ताँ तक भी ना होगी दास्तानो मे .*
————–

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close