ताज्या घडामोडी

कोरोना काळात क्रेडाई आणि नरेडको यांनी केलेले समाजोपयोगी कार्य कौतुकास्पद -: पालकमंत्री छगन भुजबळ*.

*कोरोना काळात क्रेडाई आणि नरेडको यांनी केलेले समाजोपयोगी कार्य कौतुकास्पद -: पालकमंत्री छगन भुजबळ*.

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक, दि. 4 डिसेंबर 2020
कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावापासून सर्वसामान्यांचा बचाव व्हावा हा हेतू ठेऊन शहरातील क्रेडाई आणि नरेडको या संस्थांनी केलेले समाजोपयोगी कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कै.पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय येथे आयोजित क्रेडाई नाशिक मेट्रो आणि नरेडको नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्याने कोव्हीड पार्श्वभूमीवर दुर्बल घटकांसाठी मास्क आणि सॅनिटायझर वितरण कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, विभागीय अधिकारी विवेक धांडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, कोरोना नोडल अधिकारी डॉ.आवेश पल्लोड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार आपण आपल्या कुटुंबांची, समाजाची काळजी घेऊन या विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव केला पाहिजे. कोरोना विषाणूची दाहकता मोठ्या प्रमाणावर आहे. ती नागरिकांनी समजून घ्यायला हवी. त्यापासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि दोन व्यक्तींमध्ये अंतर या त्रिसूत्रीची आवश्यकता आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दराच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्युदर कमी आहे. तो शून्य कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत; लवकरच लस तयार होऊन उपलब्ध होईल मात्र तोपर्यंत मास्क, सॅनिटायझर हीच आपल्यासाठी लस आहे.

संकटकाळात जिल्ह्यात क्रेडाईसारख्या अनेक संस्था नाशिककरांसाठी उभ्या राहिल्या. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांच्या सहयोगाने क्रेडाई तसेच जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी सर्व सोयींनी सक्षम असलेले कोव्हीड केअर सेंटर ठक्कर डोम येथे उभारले. कोरोना संसर्गबधितांना या सेंटरमध्ये मोफत उपचार दिले गेले. या सेंटरची चर्चा मंत्रालयीन बैठकांमध्ये देखील झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेली कामगिरीदेखील कौतुकास्पद आहे. यात जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य यंत्रणा आणि शहरातील स्वयंसेवी संस्था यांचे आभार यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी मानले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले, महानगरपालिका सध्या मास्क परिधान न केलेल्या नागरिकांवर कारवाई करत आहे; यापुढे मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाई सोबतच मास्क देखील वाटण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा हा सामाजिक भावना जपणारा आणि संकटकाळात एकता दाखवणारा जिल्हा आहे. क्रेडाई आणि नरेडको सारख्या संस्था या कठीण काळात नागरिकांची मदत करत आहे. ही दातृत्वाची भावना पुढच्या पिढीसाठी आदर्शवत असणार असल्याचेही आयुक्त श्री.जाधव यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते दुर्बल घटकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close