सांस्कृतिक

ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा ‘महात्मा फुले समता पुरस्काराने’ गौरव*

मराठा समाजाला ओबीसी समाजाचा पाठींबा असतांना काही विघातक शक्तींकडून समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न – छगन भुजबळ*

*कपील कट्यारे प्रतीनीधी नाशिक

ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने oयांचा ‘महात्मा फुले समता पुरस्काराने’ गौरव*

*मराठा समाजाला ओबीसी समाजाचा पाठींबा असतांना काही विघातक शक्तींकडून समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न – छगन भुजबळ*

*ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची गरज – छगन भुजबळ*
नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे
नाशिक (पुणे) – मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाही. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिले गेले. त्यानंतरपुन्हा फडणवीस सरकारने त्यासाठी दुसरा कायदा केला. त्याला देखील आपण पाठींबा दिला असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका आपण मांडली. ही सर्व पक्षीय भूमिका असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने नेहमीच मराठा आरक्षणाला पाठींबा दिलेला आहे. ओबीसी समाज हा नेहमीच मराठा आरक्षणाला सपोर्ट करत असतांना समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून हा लढा वेगळ्या दिशेने जोतोय कि काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आरक्षण ओबीसी टिकविण्यासाठी रस्त्यावर येऊन आपली ताकद दाखविण्याची गरज आहे. जर कुणाच्या न्याय, हक्कावर आरक्षणावर गदा येणार असेल तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे लढा उभारल्याशिवाय राहणार नाही असे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने आज पुणे समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा हा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत पार पडला. या आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष,मानपत्र, शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह याचा समावेश आहे.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके, रविंद्र पवार, शिवाजीराव नलावडे, डॉ.विठ्ठल लहाने, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डी.वाय.पाटीलचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, डॉ.शेफाली भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, प्रा.दिवाकर गमे, ऍड.सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे,मनीषा लडकत, प्रा.गौतम बेंगाळे यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सुख दु:खात अडचणीत काम करण्याच बळ मिळते ते उर्जा केंद्र महात्मा फुले वाडा आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो नागरिकांना नजर पुन्हा एकदा मिळवून दिली. त्याप्रमाणे त्या काळात बहुजन समाजाला दृष्टी देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. केवळ नजर असून तुम्ही समाजासाठी काही करू शकत नसाल तर त्या नजरेचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते असे ते म्हणाले, ते म्हणाले कि, देशातील मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. त्यानंतर जालना येथील पहिल्या सभेत मंडल आयोग लागू करण्याची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करून या मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून दिला. तसेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव पुण्याच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले की, इतर मागासवर्गीय समाजाच्या विकासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी उभारण्यात आलेल्या महाज्योतीसाठी तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आम्ही भरीव निधीची मागणी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मुले व मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, इतर मगासवर्गीय समाजातील बांधवाना घरकुल मिळावं यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना यासह विविध योजनांची मागणी आपण केलेली आहे. तसेच नोकरी मध्ये असलेला मागासवर्गीय समाजाचा अनुशेष भरून काढण्यात यावा अशी आपली मागणी आहे. या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा विश्वास छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मिळलेला हा पुरस्कार मी ज्या बहुजन समाजातून येतो त्या बहुजन समाजातून मिळाला असून त्यांचा मला मनस्वी आनंद आहे. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगीतले. ज्यांनी किडनी बदलली आहे त्यांना बदलल्यानंतर १० ते बारा वर्षाचे आयुष्य मिळते मात्र मला माझ्या आईने दिलेली किडनी आणि आजवर केलेल्या कामातून मिळालेल्या आशीर्वादातून मला २५ वर्षाहून अधिक आयुष्य लाभले. या कामाबद्दल मला आज महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हा पुरस्कार माझ्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना देतो असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, कोविड ला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून त्याच भान ठेवलं पाहिजे. मास्क हे सद्या आपल्यासाठी महत्वाचे व्हॅक्सीन आहे. जगात दुसरी लाट आली असून ती लाट आटोक्यात आणण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. त्यातून आपण या लाटेला सौम्य पद्धतीने रोखू शकतो असे सांगत नेत्ररोग्याच्या चेहऱ्यावर आलेल हासू माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण स्वतःसाठी जगत असतांना समाजासाठी दुसऱ्यासाठी जगल पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

समता परिषदेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ लेखक प्रा.हरी नरके म्हणाले की, बहुजन समाजाने आज डॉ.तात्याराव लहाने यांचा आज सन्मान केला. म्हणजेच त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचा सन्मान होत आहे असे गौरोदगार त्यांनी काढले. ते म्हणाले की, सद्या काही लोक लोकशाहीच्या चारही स्तंभांना हातात घेऊन काम करत आहे. अशा परिस्थितीत महापुरुषांचे विचार टिकतील का प्रश्न आहे. तरी देखील अशा परिस्थितीत तात्याराव लहाने यांच्या सारखे डॉक्टर न डगमगता आपली सेवा करत असून त्यांचे हे काम महान असे आहे. ज्यावेळी पुण्यात आणि महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी घरोघरी जाऊन लोकांसाठी काम केले अशी आठवण त्यांनी संगीतली आणि आज तोच वारसा घेऊन डॉ. तात्याराव लहाने हे काम करत आहेत आजच्या या विपरीत परिस्थितीत महापुरुषांचे विचार टिकविण्यासाठी आपल्याला क्रांतीकारी काम करावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे त्यांना या कार्यक्रमावेळी श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी तर प्रा.नागेश गवळी यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close