*१६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ७९ पानांचं पत्र, ठाकरे गटाकडून झिरवाळांना दिलं
विधानभवनात हालचाली! विधानसभा अध्यक्ष परदेशात असताना ठाकरेंची मोठी खेळी, आमदारांच्या अपात्रतेसाठी उपाध्यक्षांची…
शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुनावला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या निर्णयांवर कोर्टाकडून ताशेरे ओढण्यात आले. तर शिंदे गटाने केलेली भरत गोगावले यांची प्रतोद पदाची नियुक्ती देखील बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आता आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारं निवेदन आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिलं आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर असल्याने उपाध्यक्षांना निवेदन दिलं असल्याच प्रभू यांनी सांगितलं आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू, माजी मंत्री अनिल परब, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.
आमदारांच्या अपात्रेबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या चौकटीत राहून निर्णय घेण्याबाबत पत्र देणार आलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रेबाबत ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसत आहे.