नाशिक विमानतळ नामकरणाचा* *चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात!* समिती निमञक तानसेन भाई नन्नावरे याची माहिती,
*नाशिक विमानतळ नामकरणाचा*
*चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात!*
समिती निमञक तानसेन भाई नन्नावरे याची माहिती,
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-: नाशिक विमानतळाचे ‘पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या प्रश्नाचा चेंडू केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.
नाशिक विमानतळाचे नामकरण करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे नमूद करतानाच विमानतळाच्या नामकरणासाठी विधिमंडळात रीतसर ठराव संमत करून राज्य सरकारने तो मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला तरच त्यावर पुढील कार्यवाही प्रचलित नियमानुसार केली जाईल, असे नागरी विमान उड्डाण खात्याने स्पष्ट केले आहे. त्या खात्याचे उपसचिव नरेंद्र सिंग यांनी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तानसेन ननावरे यांना पाठवलेल्या पत्रातून नाशिक विमानतळाच्या नामकरणाबाबतची मोदी सरकारची भूमिका समोर आली आहे.
त्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. या मागणीसाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टीसह अनेक आंबेडकरवादी संघटना गेले काही वर्षे आग्रह धरत आहेत. त्यासाठी नाशिकमध्ये आंदोलनेही झाली आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी आणि रिपब्लिकन सेनानी दादासाहेब गायकवाड यांची नाशिक ही कर्मभूमी आहे. तसेच त्यांच्या आग्रही मागणीमुळेच यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्री असताना नाशिकनजीक ओझर येथे मिग विमान कारखाना दिला आहे. जिल्ह्याला रोजगाराची संधी देणाऱ्या त्या विमान कारखान्याचे श्रेय सर्वस्वी दादासाहेब गायकवाड यांना दिले जाते. त्यामुळे नाशिक विमानतळाला त्यांचे नाव द्यावे,अशी मागणी त्या जिल्ह्यातील जनतेची आहे.
युनायटेड रिपब्लिकन पार्टीतर्फे १९ एप्रिल रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी धरणे धरण्यात आली होती. त्यानिमित्ताने पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी आमच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक घेतली. त्यातही नाशिक विमानतळाला दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी अग्रस्थानी होती, असे युनायटेड रिपब्लिकन पक्ष संस्थापक व विमानतळ नामकरण समिती निंमञक तानसेन ननावरे यांनी सांगितले.