यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जुलै-ऑगस्टमध्ये काय घडणार; ‘स्कायमेट’कडून मान्सूनचा अंदाज जाहीर
*यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जुलै-ऑगस्टमध्ये काय घडणार; ‘स्कायमेट’कडून मान्सूनचा अंदाज जाहीर*
मुंबई: राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे ९४ टक्के पाऊस पडेल, असा प्राथमिक अंदाज ‘स्कायमेट’ या अमेरिकेतील खासगी संस्थेने सोमवारी वर्तवला. देशात जून ते सप्टेंबर या काळात सर्वसाधारण ८६८.८ मिमीच्या तुलनेत ८१६.५ मिमी पाऊस पडण्याची शक्यताही संस्थेने व्यक्त केली. भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) या महिनाअखेर सन २०२३च्या मान्सून हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात येईल. पण ‘स्कायमेट’ने जानेवारीत मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता. आताही अनुमान जाहीर केले आहे. यामध्ये अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे.
‘एल निनो’मुळे देशाच्या उत्तर आणि मध्य भागातही पावसाच्या सरासरीवर परिणाम होऊ शकतो. राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश येथे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे ‘स्कायमेट’ने नमूद केले आहे.
यंदा सर्वसामान्य पावसाची केवळ २५ टक्के शक्यता आहे. दीर्घ कालावधीचा पाऊस सरासरीच्या (एलपीए) ९४ टक्के अपेक्षित आहे. अनेक भागांत दुष्काळ पडण्याची शक्यता २० टक्के आहे. ‘एल निनो’मुळे आगामी काळात मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे, असे ‘स्कायमेट’ने अधोरेखित केले.
दरम्यान, आता यानंतर सर्वांच्या नजरा भारतीय हवामान खात्याच्या भाकिताकडे लागल्या आहेत. भारतीय हवामान खात्याकडून (IMD) दरवर्षी १५ एप्रिलच्या सुमारास मान्सूनच्या पावसाविषयी अंदाज जाहीर केले जातात. पावसाच्या अंदाजानुसार देशभरातील शेतकरी आपले नियोजन करत असतात. त्यामुळे मान्सूनच्या पावसाविषयीचे अंदाज अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात.
‘स्कायमेट’ मान्सूनचा अंदाज
– ११० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता : शून्य टक्के
– १०५ ते ११० टक्के पावसाची शक्यता : १५ टक्के
– ९६ ते १०४ टक्के पावसाची शक्यता : २५ टक्के
– ९० ते ९५ टक्के पावसाची शक्यता : ४० टक्के
– ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता : २० टक्के
*राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता*
१३ ते १५ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात ढगाळ हवामान आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मंगळवार आणि बुधवारी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे