अमृत दोन अभियानांतर्गत येवला शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करा – छगन भुजबळ*
अमृत दोन अभियानांतर्गत येवला शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करा – छगन भुजबळ*
*नाशिक,येवला,दि.६ फेब्रुवारी :-* येवला शहराला सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने येवलेकरांना रोज पाणी मिळावे त्याचप्रमाणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील वाढलेल्या वसाहतींचा अभ्यास करून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत अमृत २ अभियानातून येवला नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करावा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, दिलीप खैरे यांच्यासह या योजनेचे सल्लागार आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,येवला शहराला सद्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने येवलेकरांना रोज पाणी मिळाले पाहिजे.शहराची लोकसंख्या साधारणतः ७० हजार आहे. शहरातील अस्तित्वातील पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये पूर्ण झालेली आहे. मात्र त्यानंतर शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या नागरी वस्तीमुळे या पाणीपुरवठा योजनेवर ताण निर्माण झाला आहे. पालखेड डावा कालवा उदभव असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाची क्षमता कमी पडत असल्यामुळे शहराला कधी कधी तर ५/६ दिवसाआड पाणी दिले जाते.
शहर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाची क्षमता वाढवणे किंवा नवीन साठवण तलाव निर्माण करणे, शहरातील सर्व घरांना नळ जोडणी देण्याकरिता वाढीव कुटुंबासाठी व नव्याने निर्माण झालेल्या वसाहतींसाठी अंतर्गत वितरण व्यवस्था निर्माण करणे, नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे,पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे,३.५ व ९.५ एलएलडी जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करणे-क्षमता वाढविणे,जलशुद्धीकरण केंद्रासाठी सौरउर्जा प्रकल्प निर्माण करणे, शहरातील नळजोडणीला वॉटर मीटर बसवणे. या कामांचा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये समावेश करावा अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.
त्याचप्रमाणे भुजबळ म्हणाले की,शहराची आगामी तीस वर्षांनंतरची लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होईल यासाठी नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची निर्मिती करण्यात यावी. येवल्यातील तीनही साठवण तलावांची क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्यासोबतच अस्तारिकरण करण्यात यावे. येवल्याला अडचणीच्या काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी येसगाव येथील साठवण तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. यासाठी येवला ते येसगाव १४ किलोमीटर पाईप लाईन टाकण्यात यावी. तसेच अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी एक्सप्रेस कॅनॉलला पाईप लाईन जोडून त्याचे पाणी येसगाव साठवण तलावात घ्यावे. त्यामुळे टंचाईच्या काळात येवला शहराला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
येवला शहरातील भविष्यातील पाण्याची सुविधा करण्यासाठी अमृत दोन अभियानांतर्गत शासनास तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. तसेच या प्रस्तावांचा पाठपुरावा करून ही कामे तातडीने मार्गी लावावी. त्याचबरोबर येवला भुयारी गटार योजना, येवला व्यापारी संकुल, गंगासागर तलाव सुशोभिकरण,येवला शहर स्वच्छता आणि सुशोभिकरण ही कामे तातडीने पूर्ण करावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.