येवला व नगरसुल रेल्वे स्थानकाचा विकास करण्याची छगन भुजबळ यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी*
*येवला व नगरसुल रेल्वे स्थानकाचा विकास करण्याची छगन भुजबळ यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी*
*मालवाहतुक व प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या नगरसूल व येवला रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या अमृत योजनेमध्ये प्राधान्याने सामावेश करा – छगन भुजबळ*
*नाशिक, दि.९ जानेवारी:-* प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या नगरसूल व येवला रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक ‘ योजनेमध्ये सामावेश करून या स्थानकांचा प्राधान्याने विकास करण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठविले आ
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे देशभरातील २४७ स्टेशनची पुनर्विकासासाठी निवड करणार आहे.रेल्वे प्रशासन प्रत्येक रेल्वे विभागातून प्रत्येकी २ स्टेशन्स निवडून त्यांचा विकास पहिल्या टप्प्यात करणार आहे. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून नगरसुलचा स्थानकाचा विकास प्राधान्याने करावा असे त्यांनी म्हटले आहे जेणेकरून जगप्रसिद्ध येवला ‘पैठणी’ One Station One Product धोरणांतर्गत नगरसुल स्थानकावर प्रोत्साहित करण्यात येईल.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय रेल्वे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एक हजार छोटया रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येत आहे. या योजनेतून प्रत्येक विभागातून १५ स्थानके निवडण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागातून येवला स्टेशनचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या स्थानकाचा विकास करतांना प्लॅटफॉर्म २ चा विकास करण्यात यावा. याठिकाणी फुट ओवर ब्रिज विकसित करावे, मालाची साठवून करण्यासाठी गुड्स शेड उभारून गुड्स प्लॅटफॉर्म बांधावे. यातून येवला स्टेशन येथे मंजूर खत रेक पॉइंट कार्यान्वित होऊन खताची रेक वाहतूक चालू करण्यास मदत होणार आहे. तसेच सद्या येवल्याचे खताचे जे रेक आज मनमाड, नांदगाव येथे उतरतात ते थेट येवल्यात उतरवले जातील असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, येवला व नगरसूल या स्थानकावर देशभरातून नागरिक हे शिर्डीसाठी येतात. तसेच या परिसरात शेतमालाची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने या स्थानकांचा विकास प्राधान्याने करण्याची नितांत आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने सुरु केलेल्या अमृत योजनेमध्ये या स्थानकांचा समावेश करून त्यांचा विकास करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे केली आहे.