ताज्या घडामोडी

समाजभानची दशकपुर्ती.. समाजभानची दहा वर्षे.!* (कार्य आढावा)

*समाजभानची दशकपुर्ती.. समाजभानची दहा वर्षे.!*
(कार्य आढावा)

समाजभान..! राष्ट्र उभारणीसाठी जिथे चांगले काम तिथे समाजभान.!

कुणा एका कादंबरीत वाचलं होतं की, “अनिश्चित मनाची माणसे जेव्हा निश्चित ध्येयाने प्रेरित होऊन झपाटून जातात तेव्हा त्यांच्या जगण्यातुन इतिहास घडतो..” असंच काहीसं अल्लड, अनियंत्रित,बेबंध नि अनिश्चित आयुष्य जगणारा मी काही हरवलं म्हणून जगणं शोधत असताना, तीन वेळा आत्महत्येच्या बाहुपाशात अडकून पुन्हा निसटून आलो. स्वतःला जगातला सगळ्यात मोठा करंटा असं समजणारा मी झोपडपटीच्या एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो काय; नि विकास गाढे सारख्या दुसरीच्या वर्गातल्या मुलानं माझ्यातल्या झोपलेल्या जगण्याला आणि स्वत्वाला जागं काय..! त्याचं झोपडपट्टीनं माझ्यातल्या अनियंत्रित माणसाला जगातल्या वैश्विक दुखां:च आणि समाजाच भान करून दिलं. त्याच दुःखाला स्वतःच्या जगण्याचा भाग म्हणून समाजातील वेदनांना जाणवून घेण्याचा प्रयत्न केला नि त्यातूनच उमललं स्वच्या जगण्यातुन समाजाचं भान.. समाजभान..!

   आपल्या बाल मित्रांना घेऊन आपल्यापरीने *”जिंदगी वसूल”* काम करायचं ठरवून; आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सिंचन, स्वच्छता, पर्यावरण, युवाप्रेरणा या विषयावर आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रानुसार योगदान देण्याचा आणि त्यातुनच आपल्या मैत्रीच्या आठवणी याच समाजभिमुख कार्यातून चिरतरुन करण्याचा विचार त्या तरुणाने मित्रांसमोर मांडला; आणि याच विचारातून सुरवातीला “मैत्रेय प्रतिष्टान” या नावाने व नंतर “समाजभान” या नावाने समाज सेवेबरोबर समाजपरिवर्तनासाठी काम करणारीएक चळवळ उभी राहीली…

  *पर्यावरण-* सुरुवातीला स्वतःच्या दैठणा या गावात समाजभान विचारातून गणेश मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. ती सुरवात झाली वृक्षारोपणापासून. 2010 साली लावलेले 100 रोपटे आज गावतल्या लहान थोरासाठी विसाव्याची ठिकाणं झाली आहेत. याच वृक्षारोपण मोहिमेचे रूपांतर कालांतराने पर्यावरण रक्षण मोहिमेत झालं. 2011 ला पर्यावरण रक्षणाच्या या मोहिमेतून ते आजवर जिल्ह्याभरात जवळपास 32000 वृक्ष लावण्यात आले असून, जवळपास 28 हजार वृक्ष समाजभान कडून वितरित करण्यात आले. त्यांचे पालकत्वही समाजभान कडून घेण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी समाजभान कडून लाखोंची बक्षिसे असलेली पर्यावरण रक्षक चषक स्पर्धाही मराठवाडा स्तरावर ठेवण्यात आलेली आहे.

*रक्तदान व अवयवदान-* जयंती उत्सव हा समाजाला जोडण्याचा धागा असतो; अस असलं तरी आजच्या विषम परिस्थितीत जयंत्या ह्या जातीय विषमतेला व व्यसनाधीन तरुण घडण्याला कारणीभुत ठरत असल्याच्या जाणिवेतून, महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून लोकपयोगी आणि समाजमनावर परिणाम करणाऱ्या, महापुरुषांना अपेक्षित असणाऱ्या विधायक कार्याला खऱ्या अर्थानं सुरवात झाली. बलिदान, समाजभान जागृतीसाठी आणि रक्ताच्या बंधानं माणूस म्हणून एकमेकांशी जोडण्यासाठी “दो बुंद देश के नाम” म्हणत 2010 मध्ये शिवजयंतीला पहिल्यादाच रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं. तिच रक्तदान मोहीम एक चळवळ म्हणून आता प्रत्येक स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सातत्याने अंबड घनसावंगीच्या वेगवेगळ्या भागात रुजवली गेली असून त्यामाध्यमातून आजवर समाजभान आयोजित जवळपास 64 रक्तदान शिबिर व समाजभान प्रेरित 143 शिबीर आयोजित करून, 3000 पेक्षा जास्त रक्तदात्यांची दातृत्व असणारी फळी तयार झाली आहे. याच मोहिमेतून आजवर जवळपास परिसरातल्या 4000 पेक्षा जास्त रुग्णांना अंबड, जालना, बीड व औरंगाबाद येथे थेट रक्तपुरवठा व अप्रत्यक्ष रित्या अनेक रुग्णांची रक्ताची गरज भागवण्यात आली आहे. यातुन अनेक रुग्णांना वेळीच रक्त मिळत असल्याचा मनाला आत्मिक आनंद होत आहे. रक्तदानाबरोबर यापुढे समाजभानकडून अवयदानाची मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

     *युवा प्रेरणा-* प्रश्न अनेक होते आणि आहेत. गरिबी, भूकमारी, बेरोजगारी, स्त्रीयांचे प्रश्न, बिघडत चाललेली युवापिढी व समाजव्यवस्था अशा अनेक सामजिक विषयावर भरीव कामाची गरज आहे, या जाणिवेपोटी या कामासाठी अनेक समाजभान हातांची गरज होती. याच भूमिकेतून हे काम आपल्यापुरतं न राहता, यात अनेक समाजप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि माणुसकीला मानणारे कार्यकर्ते तयार व्हावेत, म्हणून एका वैचारिक बैठकीसाठी समाजभानच्या वतीनं प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रबोधनातून युवकांना व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते, अशी जाणीव होताच युवा दिनानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींचे व्याख्यान, मुलाखती दरवर्षी आयोजित करण्यात येत आहेत. त्या माध्यमातून लोकांना समाजभान कार्याची ओळख होऊ लागली. नुसत्या प्रबोधनावर काम न थांबता, लोकांच्या समस्येवर ग्राउंड लेव्हलला जाऊन थेट काम सुरू झालं. जयंत्या, शाळा , सार्वजनिक कार्यक्रमामधून सामाजिक कार्याची रुजवण करण्यासाठी स्वतः गावोगावी फिरून प्रबोधन, परिवर्तन व समाजोपयोगी काम आजही सुरू आहे. या माध्यमातून अगदी गटार काढण्यापासून झाडे लावण्यापर्यंत नवीन कामे आणि नविन लोकं समाजभानसोबत उभारले जात होते. त्यातून अनेक गावांत व्यसन मुक्ती करणारे तरुण जोडल्या गेले, वृक्ष मित्र, रक्तदाते, समाजसेवी आणि समाजभान कार्यकर्ते तयार होत गेले. आज स्वयंस्फूर्तीने काम करणारे गावागावात अनेक समाजभान कार्यकर्ते तयार करण्यात आम्हाला यश मिळाले आहे.

              एक प्रश्न हाती घेतला की त्या प्रश्नातून अनेक प्रश्नांशी नव्याने ओळख व्हायची. हळूहळू आजूबाजूच्या सर्वसामान्यांच्या जगण्यातल्या अनेक प्रश्नांनी मन व्यथित होत होतं. प्रत्येक प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा ध्यास मनात येत होता. सामजिक जाणिवांचे निखारे अधिक पेट घेऊ लागले होते. एक माणूसही जगातल्या वाईट गोष्टींमध्ये परिवर्तन करू शकतो. पण त्या एकाला स्वतः जळून अगोदर दिव्यासारखं उजळाव लागतं. त्याच पेटलेल्या दिव्यातून अनेक दिव्यांना पेटण्याची ऊर्जा निर्माण होते. ही भूमिका प्रमाण मानून जिथे गरज असेल तिथे काम सुरु झाले.

*शैक्षणिक पालकत्व-* 2012- 13 चा काळ मराठवाड्यासाठी दुष्काळाचा होता. म्हणून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात या उपक्रमांतर्गत 25 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना शिलाई मशीन व कुटूंबाला धान्याचं वाटप करण्यात आलं. त्याच मेळाव्यात 25 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊन एका शिक्षण-परिवर्तन चळवळीला सुरुवात झाली. या मुलांची उच्च शिक्षणापर्यंत जबाबदारी समाजभान टीमच्या माध्यमातून आम्ही घेतली व ती तितक्याच सक्षमपणे आजही पार पाडत असल्याचा नितांत अभिमान वाटतोय. निरक्षरता हेच सर्व दुर्दशेच कारण आहे हे जाणून आज जवळ पास 35 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं, 145 आर्थिक दुर्बल घटकातील मुलं, 34 HIVग्रस्त मुलं, 80 भंगार गोळा करणारी व भीक मागणारी वंचित मुलं, 10 बालकामगार, अशा समाजातल्या उपेक्षित घटकातल्या मुलांचे पालकत्व समाजभान सांभाळत आहे. ती मुलं आजही हक्कानं काहीही गरज भासल्यास समाजभानकडे मागणी करतात. आणि त्यांची ती मागणी पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्याच बरोबर होतकरू हुशार पण आर्थिक दृष्टया मागास मुलांसाठी गेवराई येथील श्री. संतोष गर्जे, श्री.शाम कणके सर औरंगाबाद, नितीन लोहट परभणी, माधव पवार शहापूर यांच्या मदतीने जवळपास 20 मुलांची मोफत निवासी शिक्षणाची सोय करून देण्यात आली आहे. आता हि मुलं गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहेत. या मोहीमेसाठी कित्येकदा कर्जबाजारी होण्याचीही वेळ आली हे सांगतानाही मला कसलाच संकोच वाटत नाही. आजही पगाराचा 60% हिस्सा याच समाजभान कार्यासाठी खर्च होत असतो.

               *माणुसकीची भिंत-* कडाक्याच्या थंडीत कुडकूड करणारे लहान चिमुकली मूलं पाहून कुठंतरी मन सुन्न होत होतं. त्यात जुनी झालेली स्वेटर पाहून घरातली मुलं जेव्हा नव्या स्वेटर साठी आग्रह धरत होती. तेव्हा त्याच जुन्या स्वेटर मधून माणुसकीच्या भिंतीची संकल्पना जन्म घेत होती. थंडीच्या दिवसात वंचित असणाऱ्या समाजातील घटकासाठी, “जे नको ते द्या, जे हवं ते घेऊन जा” असं आवाहन करत माणुसकीची भिंत अंबड शहरात उभारण्यात आली. त्याच भिंतीवर अनेकांनी आपली जुने कपडे, स्वेटर, चप्पल, बूट आणून लटकवले व कित्येकांनी त्याचा उपयोग घेतला आहे. त्या द्वारे अनेक वंचिताना कपडे, थंडीच्या साहित्याचं वाटप आजही नियमितपणे सुरू आहे. त्याचा लाभ अनेक वंचितांना मिळाला असून, हिच समाजभानच्या माणुसकीच्या भिंतीची प्रेरणा घेत महाराष्ट्रात अनेक माणुसकीच्या भिंती तयार झाल्या आहेत.

*पालावरची दिवाळी-* बाबा आमटे म्हणायचे, “समाजाला एका अंधारातुन प्रकाशात घेऊन जायचे, त्या अंधारात प्रकाश निर्माण झाला की, परत दुसऱ्या अंधाराच्या शोधात बाहेर पडायचे. असं करत करत समाजातला सगळा अंधकार मिटवून टाकायचा..!” याच वाक्याला दिशादर्शक समजून समाजातले अनेक अंधार आमची वाट पहात होते. त्यातूनच “एक दिवा पेटवूया, चला दिवाळी साजरी करूया” या उपक्रमाला 2015 मध्ये सुरवात झाली. दारोदारी अन्नासाठी झोळी घेऊन फिरणाऱ्या एका मुलाला विटलेलं अन्न खाताना पाहून या अभियानाचा जन्म झाला. पोटासाठी जे झोळीत पडेल ते खाणाऱ्या लेकरांची दिवाळी कुठेतरी आनंदाची आणि गोड धोड व्हावी असं आम्हाला वाटू लागलं. आज इथे, उद्या तिथे जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या पालवरच्या अंधाऱ्या झोपडीतल्या लेकराची आणि त्याचबरोबर घर सोडून कारखान्यावर राहणाऱ्या कोप्यावरच्या ऊसतोड कामगारांची प्रत्येक वर्षीची दिवाळी दिवाळी गोड करण्यासाठी समाजभान टीमनं त्यांच्या झोपड्यात जाऊन दिवाळी साहित्या बरोबरच, कपडे, साड्या ,चादर, मिठाई, फटाके, अत्तर, साबण ,उटणं, दिवापणती या साहित्याच वाटप करून दिवाळी साजरी करत आहे. या प्रयत्नाला समाजातील माणुसकीवर प्रेम करणाऱ्या दात्या लोकांचही सहकार्य मिळत गेलं. या मोहिमेअंतर्गत एकात्मिक सल्ला केंद्र, उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी HIV ग्रस्त महिलांना प्रत्येक वर्षी भाऊबीज व प्रसंगीक उपक्रमावेळी मिठाई, कपडे वाटप करण्याबरोबरच महिलांना भाऊबीज म्हणून साडी वाटप करण्याचं काम समाजभान टीम कडून करण्यात येत.

       *मनोरोगी ते माणूस* – रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार, बेघर मनोरोग्यांना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मोफत उपचार व दैनंदिन गरज भागविण्यासाठी त्यांच्या विस्थापणाचं कार्य समाजभान टीमन हाती घेतला. या द्वारे आजवर 34 मनोरुग्ण, 12 निराधार, बेघर लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यात समाजभाला यश मिळालं आहे. जगणे वेडे ठरवलेल्या मनोरुग्णात समाजभाननं माणूस शोधला आणि त्या निराश्रित लोकांना माणसात आणून हक्काचा निवारा दिला.

*दुर्दर आजारी रुग्णांना अर्थ साहाय्य-* कॅन्सरपासून किडनीच्या आजारापर्यंत दुर्दर आजाराग्रस्त असणाऱ्या 64 गरीब व गरजू कुटूंबातील रुग्णासाठी सोशल मीडियाच्या साह्याने मदत मोहिमेच काम हाती घेण्यात येऊन अगदी चार लाखापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतची मदत याद्वारे अनेक रुग्णांना करण्यात आली आहे. त्याद्वारे जवळपास अनेक रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली आणि त्या माध्यमातून गेल्या 8 महिन्यात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना लाभ करून देण्याचा प्रयत्न झाला.

*भीक मागणारी मुले शिक्षण प्रवाहात-* दारोदार भीक मागत फिरणारे, भंगार गोळा करणारे मुलं, ज्यांना समाजव्यवस्थेत बहिष्कृताची वागणूक मिळत होती अशा मुलांसाठी डॉ बाबासाहेब आबेडकरांच्या जयंती दिवशी 2016 मध्ये “वंचितांच्या अंगणी शाळा” भरवून या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्याच्याच वस्तीत शाळा सुरू करण्यात आली. याच वस्तीतल्या वंचित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण शालेय साहित्याबरोबरच त्यांना शाळेतून ने आन करण्यासाठी स्कूल व्हॅनची सोय करून देण्यात आली आहे. याच वस्तीत कायमची शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वस्तीतली भीक मागणारे हात आज शाळेत अ, आ, इ गिरवत आहेत याचा मनापासून आनंद होत आहे.

           *समाजभान वाचनालये-* वाचनप्रेरणेचे संस्कार ग्रामीण भागातील मुलांमध्ये बालवयातच रुजावेत यासाठी “एक पुस्तक युवासाठी, एक पुस्तक गावासाठी” या मोहिमेच काम टीमकडून हाती घेण्यात आलं आहे. या द्वारे आज पर्यंत जवळपास 2000 पुस्तके जमा झाली असून, अंबड, कासारवाडी, पवन अकॅडमी, पिंपरखेड व दैठणा या पाच ठिकाणी समाजभान वाचनालय सुरू करण्यात आले आहेत. यापुढील काळात 100000 (1 लाख) पुस्तके जमा करून, 100 गावामध्ये अभ्यासिका व लोकग्रंथालय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे..

*लढा दुःष्काळाशी-मदतीचा हात पुरग्रस्तांसाठी-* 2018च्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत लढा दुष्काळाशी ही मोहीम हाती घेऊन 16 शेतकरी पुत्राच शिक्षण, अंबड, घनसावगी व तिर्थपुरी येथे मोफत आरोग्य सेवा, दोन मुलींच्या लग्नाचे कन्यादान, जनावरांसाठी पाणी हौद, पाणपोई सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर उन्हातान्हात अनवाणी फिरनाऱ्या 1000 वाटसरुंना चप्पल वाटप करण्यात आल्या. एकीकडे दुष्काळग्रस्त बांधवाना मदत करण्याबरोबरच सांगली, कोल्हापूरमध्ये पुराने थैमान घातले असताना पुरग्रस्ताच्या मदतीसाठी समाजभानकडून मोठी मोहीम उभारण्यात आली होती त्याचपद्धतीने याहीवर्षी कोकणात पुरभागात मदतकार्यासाठी समाजभान टीम कोकणात जाऊन कार्यरत राहिली. या लोकसहभागाच्या मोहिमेतून पूरग्रस्तांना धान्य, किराणा, साड्या, चादर, सतरंज्या, साडे तीन लाखाचे मेडिकल, डॉक्टर कॅम्प, स्वच्छता व मयत कुटूंबाना थेट आर्थिक करण्यात आली. लोकसहभागातून मराठवाड्यात सर्वाधिक मदत समाजभान कडूनच केल्याची नोंद झाली आहे.

*कोरोना आणि मदत कार्य* – कोरोना काळात उपासमारीचा प्रश्न भेडसावत असताना दररोज 700 ते 900 कुटूंबाना एकवेळच्या अन्नाची सोय करण्याबरोबरच 1130 कुटूंबाना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा सामान पुरवण्याचे कार्य समाजभानच्या माध्यमातून राबविण्यात आले. पायी जाणाऱ्या मजुरांना अन्न, औषध पुरवण्याचे कार्य समाजभानने केले. याकालावधीत 12 रक्तदान शिबिरांचे आयोजन देखील समाजभान मार्फत घेण्यात आले.

      आजही कुठेही काही अडचण उदभवल्यास शक्य असेल ती मदत करण्यासाठी समाजभान तत्पर असते. या कामात मोलाची साथ देणारे समाजभान टीमचे हजारो सहकारी व सर्व सक्रिय सदस्य आणि समाजभान जागृत नागरिक यांच्या सहकार्यामूळे व प्रेरणेने हे सर्व शक्य होत आहे…

भान हरवलेल्या समाजात समाजभान जागृत करून मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जीवनकार्य व जीवनध्येय आम्ही खांद्यावर घेण्याचं ठरवलं आहे. समाजभान जागं ठेवून प्रत्येकांन आपल्या परीने जबाबदारी उचलावी जा आग्रह धरून समाजभान बाळगणारे लोक आणि संस्था निर्माण व्हाव्यात; जेणेकरून राष्ट्र निर्मितीस कांकणभर हातभार लागेलं एवढीच या निमित्ताने अपेक्षा… शेवटी या विषम परिस्थितीत बदल करायचा असेल तर तो स्वतःपासून करायलाच हवा ना..!

*तो बदल आम्ही आहोत… तो बदल आपण आहोत.. !*

– दादासाहेब श्रीकिसन थेटे
9764042323
समाजभान

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!