अल्पवयीन लहान मुले व मुलींच्या अपहरणांच्या सर्वत्र वाढत्या घटनांबाबत…

नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अल्पवयीन लहान मुले व मुली यांच्या अपहरणांबाबत इलेक्ट्रॉनिक मिडीया, प्रिंट मिडीया तसेच सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातम्या प्रसारीत होत आहेत. राज्यात काही ठिकाणी अशा अपहरणांच्या घटना घडत असल्याचे समजते. ही अत्यंत धक्कादायक आणि चिंता करणारी बाब आहे. यामधून मानवी तस्करी होणे, तसेच अल्पवयीन मुला-मुलींचा अवैध व्यवसायासाठी वापर होत असल्यामुळे पालकांमध्ये सध्या भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता जनतेमधून व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून याबाबत त्वरीत कार्यवाही होवून उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी गावागावात अनोळखी माणसे फिरताना आढळल्यास त्यांची कडक चौकशी व्हावी. परप्रांतीय गुन्हेगार असलेल्या लोकांच्या संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे, त्यांच्याकडे आवश्यक ओळखपत्र आहे की नाही याची चौकशी करणे, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि पालकांना दक्ष राहून प्रशासनाच्या संपर्कात राहण्याच्या सुचना देणे.. गजबजलेल्या परिसरासह ठिकठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, तसेच अशा घटना होवू नये यासाठी समाजात वारंवार जनजागृती होणे आवश्यक आहे.
आपणास नम्र विनंती की, तालुका व गाव पातळीवर यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आपल्या स्तरावरून सुचना देण्यात याव्यात ही नम्र विनंती.