चोकाक ग्रामपंचायत मधील गैरकारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठीचे उपोषण मागे
तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

हातकणंगले तालुक्यातील चोकाक ग्रामपंचायतमधील गैर कारभाराची चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसलेल्या दोघा कर्मचाऱ्यांनी अखेर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. गेल्या दोन महिन्यांपासून चोकाक गावच्या विद्यमान सरपंच मनिषा पाटील , ग्रामसेविका सौ. अनुपमा सिदनाळे व ग्रा.पं. मध्ये पूर्वी कार्यरत असलेले दोघे कर्मचारी तानाजी गुंडा कांबळे व युवराज राजाराम नंदिवाले यांच्यात आरोप प्रत्यारोपासह संघर्ष सुरु आहे. सुरुवातीस निवृत्त कर्मचारी तानाजी कांबळे व बडतर्फ कर्मचारी युवराज नंदीवाले यांनी संगणमताने ग्रा.पं.च्या परवानगीशिवाय भविष्य निधीची रक्कम परस्पर उचल्याचा ठपका ठेवत फौजदारी कारवाईचा इशारा ग्रा.पं. ने दिला होता. ग्रामपंचायत आकसबुध्दीने आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप करत, माहितीच्या अधिकाराअंतर्गत या दोघांनी मागवलेल्या ग्रा.पं.मधील खर्चाच्या व्हौवचर्स बोगस असल्याची तक्रार करत सरपंच व ग्रामसेविका यांच्या कामाबाबत शंका घेतली होती. यांचे वर चौकशीसह कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरली होती. याकरीता या दोघा कर्मचाऱ्यांसह कांही ग्रामस्थ जिल्हा परीषदेसमोर तब्बल दोन वेळा उपोषणास बसले होते. अखेर आज दि. ११ सप्टेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद( ग्रा.पं) विभागाने नमूद ग्रामसेविका सौ. अनुपमा सिदनाळे यांनी १५ दिवसाची रजा घेतली असून, या काळात अन्य ग्रामसेवकाला चार्ज दिला जाणार आहे. प्राप्त तक्रार अर्जानूसार ग्रामसेविका सौ. सिदनाळे यांच्या कार्यकालातील कार्यालयीन दप्तराची चौकशी होवून तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. याबाबत तसा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश हातकणंगलेचे विस्तार अधिकारी श्री. भोईटे, व कागलचे विस्तार अधिकारी श्री. अमोल मुंडे यांना दिले आहेत. त्यामुळेच आज आम्ही उपोषण तात्पूरते मागे घेत असल्याची घोषणा उपोषण कर्त्यानी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. यावेळी उपोषणकर्ते तानाजी कांबळे व युवराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या उपोषणास सामाजिक कार्यकर्त्या आशाराणीताई पाटील( आंदोलन अंकुश), आर.टी.आय कार्यकर्ते अभिजीत पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे मदन सरदार,सागर सुतार इ. मान्यवरांसह कांही ग्रामस्थांनी यास पाठींबा दिला.