सांस्कृतिक

आपण मराठी माणसं अत्यंत कृतज्ञ. आम्हाला ज्याचा लळा लागतो तो आई होतो. मग तो पुरुष का असेना! विठोबाचंच घ्याना तोही विठाई झाला. माऊली झाला.

नुसतं बाई असलं म्हणून आई होता येत नसतं. त्यासाठी आईचं हृदयही असावं लागतं

॥प्रासंगिक॥

आज सोचा तो आंसू भर आए…

आपण मराठी माणसं अत्यंत कृतज्ञ. आम्हाला ज्याचा लळा लागतो तो आई होतो. मग तो पुरुष का असेना! विठोबाचंच घ्याना तोही विठाई झाला. माऊली झाला.

तिच गोष्ट संतांची. जनाई, बहिणाई यांच्यासारखेच ज्ञानेश्वर माऊली झालेत. तुकोबा तुकाई झालेत. इतकंच नव्हे तर शिवराय शिवाई अनं भीमराव भीमाई झालेत.

माय, माऊली, आई हा मराठी माणसाने लाडक्या माणसांना दिलेला सर्वोच्च बहुमान! त्याची सर भारतरत्नलाही नाही येणार. सेवेची ती सर्वोत्तम पावती. मराठी माणसाच्या हृदयातलं आरक्षण, ध्रुवपदच ते. त्यापुढे सारी पदं फिकी. त्यामुळे असं आई होणं, यासारखं थोर भाग्य ते कोणते! सेवाकार्याची ती इतिश्रीच!

लता दिदी पाच दशकांपासून संगीतप्रेमींतच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत. त्याचा आम्हाला विशेष अभिमान वाटत आला. त्यांना भारतरत्न मिळाल्यावर तर प्रत्येक संगीतप्रेमीला आपणच भारतरत्न झालो असे वाटले. तथापि लता दिदी मात्र लताबाईच राहिल्या ‘लताई’ झाल्या नाहीत.

नुसतं बाई असलं म्हणून आई होता येत नसतं. त्यासाठी आईचं हृदयही असावं लागतं. दुर्दैवाने लताबाईंकडे ते नाही, याचा नुकताच प्रत्यय आला. परवा बाई अगदी सहजपणे म्हणून गेल्या,

“अगर महात्मा गांधी की जगह मोदीजी होते तो मुसलमानों की नस्लही पैदा नहीं होती.”

गानकोकीळेच्या कंठातील या कर्कश स्वराने हृदयातील तिच्या प्रतिमेवर ओरखडाच काढला.

ही लता ज्या वृक्षांच्या अंगाखांद्यावर बागडत महान बनली त्या मुस्लिम संगीतकार, गीतकार, निर्माते यांना काय वाटेल? याचा जराही विचार बाईंना स्पर्शला नाही. त्यांची ही थंड, शुष्क निर्लेपता पाहून धस्स झाले. ओठांवर त्यांच्याच गीताच्या पंक्ती आल्या,

जलके दिल खाक हुआ, आंख से रोया न गया,
जख्म ये ऐसा दिया, फूलों पे भी सोया न गया।
जलके दिल खाक हुआ…
हम खतावार है या हमको बनानेवाला,
चांद के मुखड़े पे भी, दाग है काला काला,
कितनी बरसाते हुई, फिर भी वो धोया न गया।
जलके दिल खाक हुआ, आंख से रोया न गया॥

खरंच डागाळलेल्या या चंद्राकडे आजवर लक्षच गेलं नव्हतं. अनेकांनी त्यावर सहकार्याचा वर्षाव करुनही तो डागाळलेलाच राहिला. आता मन म्हणतेहे,

चांद निकलेगा जिधर हम ना उधर देखेंगे

ज्या दिशेला हा डागाळलेला चंद्र उगवेल, त्या दिशेला बघू नकोस!

काही घराणी कौतुकासाठी तर काही घराणी पुरस्कारासाठीच जन्माला आलेली असतात. मंगेशकर घराणं मात्र कौतुक आणि पुरस्कार या दोन्हीकरीता अवतरले आहे. बाई आणि त्यांच्या घराण्याचं जेवढं कौतुक झालं तेवढं कुणाचंच झालं नाही. आणि पुरस्कारांचा जो रतीब त्यांना लोकांनी लावला तेवढा कोणालाही लावला नाही. त्याचं त्यांना अजिबात अप्रूप वाटलं नाही. आम्हाला लोकांनी भरभरुन दिलं. आम्ही भरुन पावलो अशी कृतज्ञता त्यांच्या कंठातून कधीच उमटली नाही. जणू कौतुक हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच होता नि तो लोकांनी पुरवला त्यात नवल ते काय!

दीदी तुम्हाला स्वराचं अनोखं वरदान लाभलेलं असलं तरी, तुमचं कार्यक्षेत्र स्वरप्रधान हिंदुस्तानी शास्रीय संगीताचं नव्हे, तर शब्द व संगीतप्रधान चित्रपट संगीताचं आहे. इथे स्वरांना शब्द आणि संगीताची साथ लागते. विविध वादकांचा मोठा ताफा लागतो. इथलं संगीतसृजन हे गीतकार, संगीतकार, वादक गायक व ध्वनीलेखक यांचा सामूहिक आविष्कार असतं. परिणामी कोणत्याही उत्तम वा लोकप्रिय संगीतरचनेचं श्रेय हे कुणा एकट्याचं नसतं. ते टीमवर्क असल्यामुळे त्याच्या श्रेयात सर्वांचा वाटा समान असतो.

तुम्ही भारतरत्न म्हणून मिरवत असल्या तरी, त्यात तुमच्या गाण्याला साथसंगत करणाऱ्या गीतकार, संगीतकार, वादक, ध्वनीलेखक आणि तुम्हाला गायनाची संधी प्रदान करणाऱ्या चित्रपट निर्माता व दिग्दर्शक यांचाही सिंहाचा वाटा आहे. गायक काही स्वतः गीतं लिहीत नाही वा गीतांना चाली लावत नाही. गायक वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तितके जन्माला येतात. पण महान गीतकार – संगीतकार हे शेकडो वर्षांनी जन्माला येतात. महान गीतकार आणि संगीतकार तुम्हाला तुमच्या उमेदवारीच्या आणि उमेदीच्या काळी लाभले हेच तुमचे भाग्य.

तुम्हाला क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटचंच उदाहरण देतो. इरापल्ली प्रसन्ना हा प्रसिद्ध अॉफ स्पिनर बॉलर निवृत झाला. निरोपाच्या भाषणात त्याने आपल्या बॉलिंगमधील विक्रमाचं श्रेय, त्याच्या बॉलिंगवर कॅच घेणाऱ्या फिल्डर्सना दिले. तो म्हणाला, ‘फिल्डर्सनी जर कॅच सोडले असते तर मी बळींचा विक्रमच करु शकलो नसतो. त्यामुळे मी त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.’ याला म्हणतात मनाचा मोठेपणा. अशा मोठेपणाचं दर्शन तुमच्यात कधी घडलंच नाही.

तुम्ही विसरलात, ज्या तुमच्या अस्खलित उर्दू उच्चारांचं कौतुक केलं जातं, त्याचं श्रेयही ज्याच्याकडे तुम्ही उर्दूचे धडे गिरवलेत, त्या कोण्या मुस्लिम नस्लच्या व्यक्तीलाच जाते.

तुम्ही विसरलात तुमच्यासाठी अर्थपूर्ण गीतं लिहिणाऱ्या साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी, शकील बदायूंनी, हसरत जयपूरी, कैफी आजमी, राजा मेहंदी अली खान, जानिसार अख्तर, असद भोपाली आदि मुस्लिम ‘नस्लच्या’ गीतकारांना.

तुम्ही विसरलात तुम्ही गायीलेल्या गीतांना सुमधुर चाली लावणाऱ्या नौशाद, सज्जाद हुसेन, खय्याम, गुलाम महंमद आदि मुस्लिम ‘नस्ल’च्या संगीतकारांना. अतिशय खडूस आणि फटकळ म्हणून ख्याती असलेला संगीतकार सज्जाद हुसेन तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणा गायिकेची कल्पनाच करु शकत नव्हता. तर संगीतकार नौशाद लताबाई, लताबाई असं म्हणत तुमचं केवढं तोंड भरुन कौतुक करीत असायचे.

तुम्ही विसरलात तुमच्या गाण्यासाठी तबला वाजवणारे अल्लारखां, शहनाई वाजवणारे बिस्मिल्ला खान, सितार वाजवणारे विलायत खान, सरोद वाजवणारे अमजद अली खान हे जागतिक कीर्तिचे वादक मुस्लिम नस्लचेच होते.

तुम्ही विसरलात तुम्हाला चित्रपटात गायची संधी देणारे मेहबूब खान, के. आसिफ, कमाल अमरोही आदि निर्माता-दिग्दर्शक मुस्लिम नस्लचेच होते. तर रेडियोच्या त्या जमान्यात तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे निवेदक अमीन सयानीही मुस्लिम नस्लचेच होते.

जिचा तुम्ही एवढा तिरस्कार करता, ती मुस्लिम नस्लच संपुष्टात आणली गेली असती, तर

* रसिक बलमा…
* बहारो मेरा जीवन भी संवारो…
* दो हंसो का जोडा बिछड़़ गयोरे…
* प्यार किया तो डरना क्या…
* तेरे सदके बलम…
* ऐ मेरे दिले नादान तू ग़म से ना घबराना…
* नगमा-ओ-शेर की बारात किसे पेश करुं…
* रहे ना रहे हम महका करेंगे…
* वो तो चले गए ऐ दिल…
* हम हैं मता-ए-कूचा…
* ये नीर कहां से बरसे…
* नैनों में बदरा छाएं…
* आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे…
* इन्ही लोगों ने ले लिन्हा दुपट्टा मेरा…

इत्यादी सुवर्णमुद्रांनी तुमची गंगाजळी समृद्ध झाली असती काय? आज तुमच्या जन्मदिनी हे सगळं आठवल्यावर, शुभेच्छांऐवजी तुमचंच गीत ओठांवर आलं,

दिल की नाजूक रगें टूटती हैं,
ऐसे भी कोई याद ना आए।
आज सोचा तो आंसू भर आएं।

शुक्रवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. २८.०९.२०१८ : राजगुरुनगर.
*******

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close