ताज्या घडामोडी

भिवंडीतील धर्मीपाडा आदिवासी वाडीतील विदारक चित्र… पाडा अंधारातच*

*भिवंडीतील धर्मीपाडा आदिवासी वाडीतील विदारक चित्र… पाडा अंधारातच*

*सुहास पांचाळ /पालघर*

भिवंडी / 22 सप्टेंबर : भिवंडी तालुक्यातील दिघाशी या गावातील धर्मीचा पाडा या आदिवासी वस्तीमध्ये स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही काळाकुट्ट अंधार आहे. 25 कुटुंब असलेल्या या वस्तीत अजिबातच रस्ता नाही. चिखल तुडवत, नाले ओलांडत दीड किलोमीटरचा प्रवास करत या लोकांना मुख्य रस्त्यावर यावे लागले. आतापर्यंत या गावात फक्त 2 हातपंप आहेत ( एक 30 वर्षांपूर्वी तर एक 4 वर्षांपूर्वी बसवलेले आहेत). एप्रिल महिन्यातच हे हातपंप बंद होतात. येथे असलेले 40 मतदार लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत साठी नियमित मतदान करतात.

या गावात आज पर्यंत रस्त्याचा साधा दगड पडलेला नाही. ना मुख्य रस्त्याला जोडलेला रस्ता ना अंतर्गत रस्ता ना पेव्हर ब्लॉक ना काँक्रेट रस्ता याचा कसलासा पत्ता नाही. या ठिकाणी अत्यंत परिश्रम घेणारे शेतमजूर आहेत. वन जमिनीत प्लॉट काढून उत्तम शेती करत आहेत.मात्र या शेतीला पुरेसे पाणी देण्याची, वीज देण्याची साधी तसदी कुणी घेतलेली नाही. इतके वर्ष या ठिकाणी वीज कनेक्शन देखील नव्हते, श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी विजेचे खांब आले. मात्र नंतर ते काम ही अर्ध्यावर आले आहेत.

पाड्यात अंगणवाडी नाही, गावातील अंगणवाडीचे कुणी रस्ताच नसल्याने पाड्याकडे फिरकत नाही, शाळेत जाणारी मुलं शाळा सुरू असताना पावसाळ्याचे चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात. परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात.

परवा या पाड्याचे नाव जिच्या नावावर आहे त्याच धर्मी बाई रायात या 85 वर्षीय आजीचा परवा पाय फ्रॅक्स्चर झाला, तिला दवाखान्यात नेण्यासाठी अक्षरशः एक जुन्या2 लोखंडी पलंगाचा आधार घेत तीला पालखी करून मुख्य रस्त्यापर्यंत नेले. आज श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि त्यांचे सहकारी नवनाथ भोये, रुपेश जाधव, निलेश चव्हाण,सुशांत चौधरी यांनी स्थानीक गावकमेटी कार्यकर्त्या  संगीता भोईर, बाळा भोईर ,तसेच आदेश रायात यांच्या सोबतीने या पाड्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कमीत कमी शेतकरी बाधित करता कसे रस्ता करता येईल याबाबत ग्रामस्थांना घेऊन त्यांची मतं जाणून घेतली. याबाबत श्रमजीवी संघटना आक्रमक होणार एवढे नक्की.
स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षातही आदिवासी गरिबांच्या नशिबी असे विदारक जगणे येत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काय असेल हा प्रश्न आहे.

या पाड्यात कोणत्याही मूलभूत पायाभूत  सुविधा नाहीतच मात्र  jio चे मोबाईल नेटवर्क मात्र आहे. इथूनच प्रमोद पवार यांनी google map चा वापर करून हा पाडा ते मुंबई मंत्रालयाचे अंतर मोजले तर ते केवळ 81 किलोमीटर आहे, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अंतर मोजले तर ते अवघे 42 किलोमीटर आहे तर भिवंडी तहसील कार्यालयाचे अंतर मोजले तर ते फक्त 24 किलोमीटर एवढे आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याचे मुख्यालय असलेल्या या मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या धर्मी पाड्यात आदिवासींच्या नशिबी आलेले हे वेदनादायक जगणे खरच व्यथित करणारे आहे.

ही अवस्था तालुका जिल्ह्यात अनेक पाड्यांमध्ये आहे. गावांचा विकास झाला, कार्यसम्राट, विकासपुरुष नेते गावांमध्ये पोहचले मात्र या अशा 40- 50 मतदार असलेल्या आदिवासी बांधवांच्या गावकुसाबाहेरील वाडी पाड्यात जाण्याचा रस्ता त्यांना सापडत नाही. म्हणून विकास झाला तो फक्त गावांचा, पाडे दुर्लक्षितच राहिले
धर्मी पाड्यात रस्ता होण्याबाबत जबाबदार प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर श्रमजीवी आंदोलन करेल असा इशारा यावेळी श्रमजीवी संघटनेचे  प्रमोद पवार यांनी दिला.

Share

Admin

काझी सलीम अल्लाउद्दीन 9850140788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close