ताज्या घडामोडीसांस्कृतिक

शिर्डी,साईबाबा मंदिर सुरू कण्यासाठी हालचाली सुरू

शिर्डी – राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

!

शिर्डी,साईबाबा मंदिर सुरू कण्यासाठी हालचाली सुरू

शिर्डी – राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभुमीवर साईभक्‍तांच्‍या दर्शनाकरीता उघडण्‍याच्‍या संदर्भात करावयाच्‍या उपाय-योजनांकरीता तिरुमला तिरुपती देवस्‍थान येथे संस्‍थानचे पथकाने दौरा केला असून येथे झालेल्‍या बैठकीत देशपातळीवर प्रमुख देवस्‍थानांचे फेडरेशन करण्‍याचा प्रस्‍ताव देण्‍यात आला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.
या दौ-याकरीता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा सहभाग होता. यावेळी तिरुमला तिरुपती देवस्‍थानचे अध्‍यक्ष वाय.व्‍ही.सुब्‍बा रेड्डी, कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल, उप कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.बगाटे म्‍हणाले, श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यासाठी अनेक भक्‍तांचे, शहरातील नागरिकांचे तसेच काही राजकीय पक्षांची निवेदने संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहेत. शासनाने याबाबत मंदिर खुले करण्‍यास परवानगी दिल्‍यास प्रशासनाची तत्‍परता असावी म्‍हणून नियोजन करण्‍यात येत आहे. तसेच दर्शन खुले करत असताना मंदिर प्रशासनाची यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी व भक्‍त यांचे आरोग्‍य दृष्‍टया सक्षम रहाणे करीता करावयाच्‍या उपाय-योजनांची माहिती घेण्‍याकरीता तिरुमला तिरुपती देवस्‍थान येथे भेट देवून तेथील व्‍यवस्‍थेची पाहणी करण्‍यात आली. याप्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर दर्शनरांग व्‍यवस्‍थापनबाबत माहिती घेतली. पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सुरक्षा व्‍यवस्‍था आणि या करीता वापरण्‍यात येणारे सीसीटिव्‍ही सर्व्‍हरची माहिती घेतली. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दर्शन रांगेतील यंत्र सामुग्री व मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापन बाबत मा‍हिती घेतली.
तसेच तिरुपती येथे ऑनलाईन पध्‍दतीने दर्शन दिले जात असून दर्शनरांगेची कार्यप्रणाली, लाडू निर्मीती, भोजन व्‍यवस्‍था, सीसीटिव्‍ही, मंदिर आणि दर्शनरांग साफ सफाई आदींची पहाणी करण्‍यात आली. या ठिकाणी आयोजित केलेल्‍या बैठकीत देवस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेले सोने, चांदी व इतर देणगीबाबत, बॅंकेतील ठेवी व त्‍यावरील व्‍याज पध्‍दतीबाबत, गर्दीचे व्‍यवस्‍थापन, शिर्डी संस्‍थानच्‍या प्रशासनामध्‍ये काही बदल करणे आवश्‍यक आहेत याकरीता तिरुपती देवस्‍थानचे चेअरमन, विश्‍वस्‍त व पदाधिकारी यांच्‍याशी चर्चा करण्‍यात आली. तसेच देवस्‍थानला ऑनलाईन देणगी देताना भक्‍तांची होणारी फसवणुक रोखण्‍यासाठी देशातील प्रमुख देवस्‍थानांचे फेडरेशन करुन एकच वेबसाईट तयार करण्‍याचा प्रस्‍ताव देण्‍यात आला असून याबाबत आराखडा तयार करण्‍यावर चर्चा करण्‍यात आली. ही व्‍यवस्‍था शासनच्‍या मान्‍यतेनंतर सुरु करता येईल.
राज्‍य शासनाकडून श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्‍याचे आदेश प्राप्‍त झाल्‍यास तात्‍काळ दर्शन व्‍यवस्‍था करण्‍याकरीता गर्दीचे व्‍यवस्‍थापन करुन, कोरोना बाधीत भक्‍त आढळल्‍यास त्‍यांना प्राथमिक उपचार देण्‍याची व्‍यवस्‍था करुन तिरुपती प्रमाणे उपाय-योजना करता येतील असे ही श्री.बगाटे यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close