ताज्या घडामोडी

खावटीचा कोट्यवधीचा घोटाळा श्रमजीवीने केला उघड*

*खावटीचा कोट्यवधीचा घोटाळा श्रमजीवीने केला उघड*

सुहास पांचाळ

भिवंडी/दि.8 ऑगस्ट

ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येलाच आदिवासींच्या हक्काच्या खावटी मधून खाद्यतेल आणि मसाला हडपण्याच्या संतापजनक प्रकारचा पर्दाफाश श्रमजीवी संघटनेने केला आहे. आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत सद्या खावटी किट चे वाटप सुरू आहे. या वाटपात 12 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली, मात्र प्रत्यक्षात यातील 1 लिटर खाद्यतेल गायब आहे, आज श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत असलेले खावटी वाटप होत असताना अचानक भेट देऊन हा प्रकार उजेडात आणला. यावेळी श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी या पॅक किट ला ऑन कॅमेरा अनपॅक करत यात असलेल्या वस्तूचा पार पंचनामा केला. खावटी वस्तूच्या केंद्रीय खरेदीत तब्बल 70 कोटी रुपयांचा घपला करणाऱ्या आदिवासी विकास विभाग आणि महामंडळाने आता खाद्यतेल पळवून आणखी 20 कोटी खिशात घातले असल्याचा आरोप यावेळी श्रमजीवीने केला आहे.

कोरोना काळात आदिवासींचा रोजगार गेला, उपासमार आली त्यामुळे आदिवासींना केवळ रेशनचे तांदूळ न देता त्या सॊबत जीवनावश्यक वस्तू द्यावा अशी मागणी श्रमजीवीने केली होती. त्यानंतर मागील वर्षी श्रमजीवीने या खावटी साठी अनेक आंदोलने केली, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यासाठी स्वतः उच्चन्यायालयात गेले, कडव्या संघर्षांनंतर आज कोरोना आणि लॉकडाऊन संपल्यावर ही योजना प्रत्यक्षात आली, आदिवासींचे स्थलांतर आणि खरेदीत होणाऱ्या दिरंगाई मुळे पूर्ण लाभ लाभार्थ्यांना बँक खात्यात (DBT ) ने द्यावा अशी मागणी श्रमजीवीने केली, तशीच शिफारस सुकाणू समितीनेही केली मात्र तरीही राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी महामंडळाचे अध्यक्ष के.सी.पाडवी यांनी अट्टहास करत 2000 चे सामान आणि 2000 बँक खात्यात असेच धोरण अवलंबले. यासाठी ४८६ कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनरेगावरील चार लाख, आदिम जमातीच्या दोन लाख २६ हजार कुटुंबांना, पारधी जमातीच्या ६४ हजार कुटुंबांना, गरजू, परित्यक्त्या, घटस्फोटीत, विधवा, भूमीहिन अशा तीन लाख कुटुंबाना तसेच एक लाख ६५ हजार वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या अशा ११ लाख ५५ हजार कुटुंबांना याचा फायदा मिळेल. खावटी अनुदान योजनेत एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा दोन हजार रुपयेपर्यंतचा किराणा देण्यात येईल अशी योजना आहे. मात्र हे सामान खरेदी करताना तब्बल 70 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. हे थोडेच होते तर आता प्रत्यक्ष वातपातही खाद्यतेल गायब केले हज आणि मसाला देखील हडपला असल्याचे ससमोर आले आहे.
संत गाडगे महाराज आश्रम भिवाळी गणेशपुरी याठिकाणी सुरू असलेल्या वाटपाच्या ठिकाणी आज श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार , जयेश पाटील, भगवान देसले,संजय कामडी, पारोसा यांच्या कार्यकर्त्यांन धडक दिली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

हे आदिवासींच्या तोंडातला घास हिसकावून घेण्याचे पाप असल्याची संतप्त प्रतिक्रिया यानिमित्ताने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली.या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी श्रमजीवी संघटनेने केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close