ताज्या घडामोडी

महापूरात उल्हासनदीवरील दहिवली पुलाचे नुकसान… नवीन पूल कधी होणार? दरवर्षी पूल पाण्याखाली 45 वर्षाचा झाले वयोमान

महापूरात उल्हासनदीवरील दहिवली पुलाचे नुकसान… नवीन पूल कधी होणार?
दरवर्षी पूल पाण्याखाली
45 वर्षाचा झाले वयोमान

नेरळ: दिपक बोराडे

कर्जत तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. उल्हासनदीवरील दहिवली पूल दरवर्षी महापुराच्या पाण्याखाली जात असून 45 वर्षे वयोमान झालेल्या या पुलाच्या जागी नवीन पूल कधी होणार? असा प्रश्न स्थानिक करीत आहेत.दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंते यांनी दहिवली पुलाची पाहणी केल्याने स्थानिकांच्या नवीन पुलाच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता आहे.
1976 साली बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले मुख्यमंत्री असताना दहिवली पुलासाठी कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांनी मुख्यमंत्री अंतुले यांच्याकडे शब्द टाकल्याने पुलाला मजुरी मिळाली.नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील दहिवली पुलाचे बांधकाम होऊन 45 वर्षे इतका मोठा कालावधी लोटला आहे. उल्हासनदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी महापूराचे पाणी पुलावरून जात असते.2019 मध्ये तब्बल 36 तास या पुलावरून पाणी वाहत होते,यावर्षी देखील 24 तासाहून अधिक काळ महापुराचे पाणी वाहत होते.त्यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे,त्यात पुलाचे सहा पिलर यांची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली आहे.त्यामुळे आणखी किती वर्षे हा पूल परिसरात असलेल्या 30 गावातील वाहनांची वाहतूक सहन करणार असा प्रश्न स्थानिक रहिवाशी आणि दहिवली ग्रामपंचायतचे सरपंच चिंधु तरे यांनी उपस्थित केला आहे.
सतत तीन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे दहिवली पूल धोकादायक झाला आहे.त्यात शासन निधी उपलब्ध करीत नसल्याने तीन वर्षांपूर्वी अंदाजपत्रक बनविण्यात आलेल्या उल्हासनदीवरील दहिवली पुलाचे जागी नवीन अद्याप साकारला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलच्या नवीन पूल बांधण्यासाठी 12 कोटीचे अंदाजपत्रक तयार केले होते.त्याचे काय झाले?असा प्रश्न कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे यांनी उपस्थित केला आहे.दहिवली पुलाचे काम सुरू होण्याची गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा सुरू आहे.त्याबद्दल स्थानिकांनी पुलाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला.बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजाराम गोसावी आणि कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी दहिवली पुलाची पाहणी केल्यानंतर पुलाला पावसाचा धोका किती आहे?याचा अहवाल सादर करण्याची सूचना उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांना अधीक्षक अभियंता गोसावी यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close