ताज्या घडामोडी

पावसाचा कहर …कर्जत तालुका जलमय… दोन जण वाहून गेले,घरांमध्ये पाणी शिरले, पूल पाण्याखाली, संपर्क यंत्रणा कोलमडली

पावसाचा कहर …कर्जत तालुका जलमय…
दोन जण वाहून गेले,घरांमध्ये पाणी शिरले,
पूल पाण्याखाली, संपर्क यंत्रणा कोलमडली
नेरळ: दिपक बोराडे
ढगफुटी सदृश पाऊस 21 जुलै रोजी झाल्याने कर्जत तालुका जलमय झाला होता.कर्जत शहरातील अनेक भागात आणि उल्हासनदीच्या तीरावर असलेल्या अनेक गावांत महापूराचे पाणी शिरले.पाली वसाहत येथे दरड कोसळली तर काही पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती तर सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा दुपारी दोन वाजता पूर्ववत झाला.दामत येथे पुलाजवळ चाळ बांधून राहणारे कुटुंबातील दोघे वाहून गेले आहेत.दरम्यान,महापुराचे पाणी मध्यरात्री नंतर अचानक वाढून गावागावांत शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असे वेधशाळेने जाहीर केले होते, त्यानुसार कर्जत तालुक्यात 321 मिलिमीटर तर माथेरान येथे 311 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.खंडाळा घाटात उगम पावणाऱ्या उल्हासनदीचे पाणी मध्यरात्री 12 नंतर वाढण्यास सुरुवात झाली.कर्जत दहिवली येथील पायपूल वजा बंधारा बांधण्यात आल्यानंतर कर्जत शहरात महापूराचे पाणी येत नाही.त्यामुळे निर्धास्त झोपलेल्या कर्जत शहरातील इंदिरानगर,कोतवालनगर,म्हाडा कॉलनी,महावीर पेठ,अभिनव शाळा परिसर,कचेरी खालील मुद्रे,नानामास्टर आणि समर्थ नगर भागाला महापुराच्या पाण्याने वेढा घातला होता.या पायपूल वजा बंधाऱ्यांची उंची 45 मीटर असताना त्या बांधाऱ्यावरून महापूराचे पाणी जात होते.याचवेळी पुढे उल्हासनदीचे हे पाणी जात असलेल्या भागातील अनेक गावांत पाणी शिरले.उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या वावे,बेडसे, बार्डी,मालवाडी, कोल्हारे,कोल्हारे कातकरी वाडी, धामोते, तळवडे,मालेगाव,हंबरपाडा, बिरदिले या गावातील अनेक घरात महापुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. उल्हासनदीवरील दहिवली येथील पुल लागोपाठ दुसऱ्या दिवशी पाण्याखाली गेला असून सकाळ पर्यन्त पुलावरून तब्बल 4 ते 5 फूट पाणी वाहत होते.त्यात नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील धामोते येथील रस्ता तसेच रेल्वे फाटक येथील रस्ता पाण्याखाली गेला होता.दहिवली भागातून हे पाणी कोदिवले गावाकडे गेल्याने हंबरपाडा सोसायटीपासून दहिवली गावापर्यन्तचा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती.या पाण्याच्या प्रवाहामुळे बोपेले तळवडे मार्गावरील कोल्हारे कातकरी वाडी येथील रस्ता वाहून गेला आहे.नदीच्या जवळ असलेल्या बिरडोले गावातील अर्ध्या घरात महापूरचे पाणी शिरले तर नेरळ-कळंब रस्त्यावरील धामोते पूल पाण्याखाली गेले आणि धामोते गावातील 30 घरात पुराचे पाणी शिरले. नेरळ गावातील मातोश्री नगरला 20 तास पाण्याच्या वेढा होता,तेथील चंचे चाळ पुन्हा पाण्याखाली गेली होती तर गंगानगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली असून स्थानिकांकडून ग्रामपंचायत कडे गेली तीन वर्षे निवेदन दिले जात असून गटारे बांधली जात नाहीत असा स्थानिकांचा आरोप आहे.नेरळ मधील राही हॉटेल पार्किंग मधील काही गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून वाल्मिकीनगर भागाला चारही बाजुंनी पाण्याचा वेढा होता,तर राही हॉटेल परिसरातील 100 हुन अधिक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. माथेरान-नेरळ रस्त्यावर मोठे झाड कोसळले होते त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद होती.तर नेरळ – माथेरान घाटरस्त्यात नांगरखिंड येथे झाड रस्त्यात पडले होते,तर संपूर्ण घाट रस्त्यात डोंगरातील दगड येऊन पडले आहेत.मात्र घाट रस्त्यात एकेरी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील वारे ग्रामपंचाय हद्दीतील कातकरी वाडी मध्ये घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे नुकसान झाले आहे तर आसल ग्रामपंचायत मधील कातकरी वाडीमधील 15 घरात महापुराचे पाणी शिरले असता त्या आदिवासी कुटुंबाच्या घरात अन्न धान्य भिजून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सरपंच रमेश लदगे आणि अन्य कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांना धान्य वाटप करण्यात आले.याच वाडीमधील भगवान घोगरकर यांच्या गोठ्यात पाणी साठून राहिल्याने 12 शेळया मृत झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.उमरोली ग्रामपंचायत हद्दीमधील पाली वसाहतच्या मागे असलेला डोंगर भूस्खलन झाल्याने खचला.यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,मात्र डोंगराचा भाग दगड- मातीसह खाली येण्याची शक्यता असक्याने प्रांत अधिकारी वैशाली परदेशी,तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने तेथे जात दरडीच्या छायेत असलेल्या रहिवाशांचे स्थलांतरण करण्यास सुरुवात केली आहे.
भिवपुरी रेल्वे स्थानक जवळील डायमंड सोसायटी मध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांना बाहेर पडता येत नव्हते तर स्टेशन कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. पावसाबरोबर सुरू असलेल्या वादळात भिवपुरी स्टेशन जवळील ओएचई वीज वाहून नेणारा खांब अर्धवट अवस्थेत कोसळला आहे,तो पुन्हा उभा करण्याचे मध्य रेल्वे कडून प्रयत्न सुरू होते.जामरुंग परिसरातील रजपे- टेंभरे यांना जोडणारा साकव पूल वाहून गेला असून भालीवडी परिसरातील मालवाडी येथील शेतकऱ्यांच्या तीन पोल्ट्री फार्म शेड मध्ये पाणी शिरल्याने 1200 पक्षी मृत झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर दामत येथे पाणी रस्त्यावरून वाहत जात होते.दामत येथे शेलू कडे जात असताना नाल्याच्या कडेला असलेल्या चाळीत काही कुटुंब राहतात.त्यातील मुनियार कुटुंबातील इब्राहिम मुनियार-46,झोया इब्राहिम मुनियार-6 हे दोघे रात्री दोन च्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्या चाळीत स्थानिक झोपलेले असताना पुराचे पाणी शिरल्याने काही समजायचे आत अनर्थ घडला.त्या चाळीपासून अर्ध्या किलोमीटर वर उल्हास नदी असून उल्हासनदीने रुद्ररूप धारण केल्याने त्या दोघांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close