ताज्या घडामोडी

नेरळ नळपाणी योजनेची थकीत वीज बिलामुळे वीज जोडणी कापली… 60 लाखाचे वीज बिल थकीत नेरळ मधील अनेक भागात पाण्याची टंचाई

नेरळ नळपाणी योजनेची
थकीत वीज बिलामुळे वीज जोडणी कापली…
60 लाखाचे वीज बिल थकीत
नेरळ मधील अनेक भागात पाण्याची टंचाई

नेरळ : दिपक बोराडे

नेरळ नळपाणी योजनेचे लाखो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने 15 जुलै रोजी नळपाणी योजनेची वीज जोडणी कापली आहे. त्यामुळे आज नेरळ गावातील अनेक भागात पाणी पोहचले नाही आणि ऐन पावसाळ्यात नेरळ गावात पाणीटंचाई दिसून आली.दरम्यान,नेरळ ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच पदावर बसत असतानाच वीज जोडणी कापण्यात येत असल्याने नवीन सरपंच उषा पारधी यांच्यासाठी येणारा काळ खडतर आहे?असे दिसून येत आहे.
नेरळ या नागरिकरणाकडे झुकलेल्या ग्रामपंचायत मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने 1998 मध्ये राबवलेली नळपाणी योजना उल्हास नदीवरून पाणी उचलून नेरळ गावात आणण्यात येते.बोर्ले येथे असलेल्या उद्धभव केंद्रातून पाणी उचलण्यासाठी वीज वापरली जाते आणि त्या वीज वापाराचे देयक गेली काही महिने थकीत आहे.मे 2021 मध्ये हे देयक एक कोटींच्या पुढे गेले होते.मात्र आजारी असलेले तत्कालीन सरपंच यांनी थकीत वीज बिलांचा टप्पा निश्चित करून ते थकीत बिलाची रक्कम 75 लाखांवर खाली आणली होती.मात्र रावजी शिंगवा यांचे निधन झाल्यानंतर प्रभारी सरपंच शंकर घोडविंदे यांच्याकडे सहीचे अधिकार नसल्याने थकीत वीज बिलाची रक्कम मागील महिन्यात जमा झाली नाही.परिणामी वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्याचा दबाव महावितरण कंपनीच्या नेरळ दोन क्रमांकाच्या कार्यालयावर वाढत होता. उपअभियंता कार्यालयाकडून सतत होणारी वसुलीची मागणी लक्षात घेऊन नेरळ कार्यालयाने थकीत वीज बिल भरण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतकडे तगादा लावला होता.त्यामुळे 12 जुलै रोजी नेरळ ग्रामपंचायतने 15 लाखाचा धनादेश थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनी कडे जमा केला होता.मात्र महावितरण कंपनीकडे वरिष्ठ कार्यालयाकडून असलेला दबाव यामुळे पुन्हा थकीत बिलाची मागणी नेरळ कार्यालयाने नेरळ ग्रामपंचायतकडे केली.त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला 25 जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी अशीलेखी मागणी केली होती.
मात्र नेरळ ग्रामपंचायत कार्यालय सरपंच पदाच्या निवडणुकीचे व्यस्त असताना 15 जुलै रोजी महावितरण कंपनीने नेरळ ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणारे वीज मीटर ची जोडणी कापली.बोर्ले येथील नदीमधून पाणी उचलण्याचे केंद्रातील वीज जोडणी तोडण्यात आल्याने नेरळ गावाला पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रणा ठप्प झाली.नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत वीज बिल भरण्यासाठी 25 जुलै ची मुदत मागितलेली असताना 15 जुलै रोजी वीज जोडणी तोडज्यात आल्याने नेरळ ग्रामपंचायत प्रशासन हैराण आहे.ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच उषा पारधी यांची बिनविरोध निवड होत असताना महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडण्याची केलेली कार्यवाही घाई घाईने केली असल्याचा आरोप केला जात आहे.सध्या 53 लाखाचे थकीत बिल नेरळ ग्रामपंचायतकडे असून ते भरल्यानंतरच वीज जोडणी पुन्हा जोडली जाईल अशी भूमिका महावितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतली आहे.त्यामुळे नेरळ गावातील अनेक भागात गेली काही दिवस कमी दाबाने वीज पुरवठा होत असून आता वीज जोडणी तोडण्यात आल्याने नेरळ ग्रामस्थ हैराण आहेत.

 

गणेश गायकर-ग्रामविकास अधिकारी
आम्ही याच आठवड्यात 15 लाख रुपये थकीत वीज बिलापोटी भरले आहेत, त्यावेळी आम्ही ग्रामपंचायत कडून लेखी पत्र देऊन 25 जुलै पर्यन्त वेळ मागितली होती.कोरोना आणि लोक डाऊन यामुळे कर वसुली वेळेवर होत नसल्याने वीज बिल थकीत राहत आहे.

 

बाबा नजे-ग्रामस्थ
आमच्या भागात सतत पाणी राहत आहोत त्या आणि नेरळ गावातील मुख्य गाव वगळता अन्य भागात पाणी पोहचत नाही.अनेक रहिवाशांना सकाळी हांडे घेऊन पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.त्यात पावसाळा असल्याने धुणीभांडी करायला पावसाचे पाणी वापरण्यास मिळत आहे.पण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष ऐन पावसाळ्यात सुरू असू। पाणी टंचाई सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

 

प्रवीण राठोड-शाखा अभियंता, नेरळ 2
आमच्या कार्यलयाकडून नेरळ ग्रामपंचायतला वारंवार सूचना केल्या जात होत्या.गेल्या दीड वर्षांपासून थकीत वीज देयके यांचा प्रश्न प्रलंबित आहे,त्यामुळे वीज जोडणी कापण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

 

 

 

फोटो ओळ
नेरळ नळपाणी योजना जलशुद्धीकरण केंद्र

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close