ताज्या घडामोडी

ममदापूर ग्रामपंचायतीत भष्टाचार ? सामजिक कार्यकर्ते सचीन अभंगे यांचा आरोप

ममदापूर ग्रामपंचायतीत भष्टाचार ?
सामजिक कार्यकर्ते सचीन अभंगे यांचा आरोप

नेरळ: दिपक बोराडे

कर्जत तालुक्यातील विस्ताराने आणि आर्थिक उत्पन्नाने तिसऱ्या स्थानावर असणा-या नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ममदापूर ग्रामपंचायतीत ऐन कोरोना काळात ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत प्रचंड लूट झाल्याचे गंभीर आरोप सामजिक कार्यकर्ते सचिन अभंगे यांनी केला आहे .
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, माहिती अधिकारातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अभंगे यांनी सन २०१९-२०२० व विद्यमान मार्च २०२१ अखेर झालेली विकासकामे व खरेदी केलेल्या वस्तू व दिलेल्या सेवासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिनांक ८ मार्च व दिनांक १९ मार्च २०२१ रोजी अनुक्रमे ग्रामपंचायत निधी व १५% उत्पन्न वितरण तसेच १४ वा वित्त आयोग मंजूर आराखडा नुसार विकासकामे व झालेला खर्च यांची माहिती मागितली होती. विहित मुदतीत आवश्यक माहिती न दिल्याने संबंधित अर्जदार यांनी प्रथम अपिलीय अधिकारी पंचायत समिती कर्जत यांच्याकडे सदर प्रकरणी दिनांक ०३ मे २०२१ रोजी अपील दाखल केले. प्रथम अपिल अधिकारी श्रीमती उज्वला भोसले यांनी दिनांक ०९ जून २०२१ रोजी सुनावणी घेऊन ग्रामविकास अधिकारी श्री. संजय राठोड यांना दोन दिवसात माहिती सादर करण्याचे आदेश दिले.
त्यानुषंगाने जन माहिती अधिकारी यांनी सात दिवसांनंतर दिनांक १७ जून २०२१ रोजी अर्जदार यांना सादर केलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत १५% उत्पन्न वितरणात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ममदापूर दलित वस्तीकरिता दिनांक १७ मार्च २०२० रोजी ५५,१००/- रक्कम खर्च करून १०० नग फायबर खुर्च्या खरेदी केलेल्या असतानासुद्धा दिनांक ०१ जून २०२० रोजी ८०,०००/- किमतीचे २०० खुर्च्या खरेदी केल्याचे बिल जनता भांडी भांडार यांना अदा केले असून प्रत्यक्षात मात्र खुर्च्या खरेदी केल्याच नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे या वस्तू खरेदी करण्यासाठी ई निविदा न काढता जनता भांडी भांडार यांनी कोटेशन दिलेली पावती अनुक्रमे पूनम मेटल व कैलास शाॅपी या तिन्ही दुकानांसाठी एकच असून 966, 967, 968 असे त्यांचे क्रमांक असून एकाही कोटेशनवर दिनांक नसून तिन्ही कोटेशनचे अक्षरे एकसारखी आहेत. दरम्यान, खरेदी केलेल्या अॅल्युमिनिअम पातेली झाकणसह ८४,०००/- व २१ प्रकारची स्वयंपाकी व जेवणावळी साहित्य खरेदी ८८,७००/- रक्कमेचे बिल अदा केले आहे. जनता भांडी भांडारला दिलेल्या एकूण २,५२,७००/- रक्कम बिलासाठी तारीख, जीएसटी सीएसटी कर असा कुठलाही उल्लेख नाही. या रक्कमेतून ‘एक साधा काटा चमचा’ सुध्दा विकत घेतला नाही हे समोर आले आहे. त्याचप्रमाणे माऊली ट्रेडर्स यांच्या कडून ममदापूर दलित वस्तीसाठी ५० नग केटरिंग टेबल १,७७,८००/- रक्कमेला खरेदी केल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र या किमतीत बसायला ‘साधे पाट’ सुध्दा मिळाले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच १४ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आदिवासी वाडीकरिता बंदिस्त गटार व अंतर्गत काँक्रीट अशी दोनच कामे १९२०००/- किमतीची केल्याचे दाखवले आहे. परंतु, कृषीविकास पुस्तके, शिलाई मशीन वाटप, मुलींचे जन्माचे स्वागत करण्यास मातांना देण्यात येणारी साडीचोळी खरेदी, महिला बचत गटांना प्रशिक्षण, युवतींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण आदी न झालेली कामे परंतु प्रत्यक्षात केलेला खर्च मात्र लपविण्यात आला असून त्याची वाच्यता कुठेही केलेली दिसून येत नाही. या प्रकरणी किमान आठ ते दहा लाखांचा अपहार झाल्याची नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा आहे.
———————————
दरम्यान, ममदापूर ग्रामपंचायतीचे थेट सरपंच श्री. दामोदर निरगुडा हे अशिक्षित असल्याने त्यांच्या अज्ञानाचा पुरेपूर गैरफायदा ग्रामविकास अधिकारी श्री. संजय राठोड यांनी घेतला असून कुठलीही रक्कम अदा करण्यापूर्वी प्रत्यक्ष वस्तू खरेदी केल्या आहेत का? याची तपासणी न करता एकाधिकारशाहीने संबंधित ठेकेदार दुकानदारांना परस्पर पैसे देऊन ‘चांगलेच हात धुवून घेतले असल्याचे’ नागरिकांची चर्चा आहे. या प्रकरणी बरीच माहिती दडविण्यात आली असून राजिप सामान्य प्रशासनाकडून योग्य ती चौकशी करण्यासाठी व अधिक वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी लवकरच कोकण विभाग खंडपीठाकडे दुसरे अपील सादर करणार असल्याचे माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन अभंगे यांनी म्हटले आहे.
————————————
ग्रामपंचायत निधी व एससी-एसटीचे १५% उत्पन्न वितरण असो अथवा कोणत्याही
ज्यादा रक्कमेची बिले अदा करण्यासाठी मासिक सभेची मंजुरी आवश्यक आहे. १४ वा वित्त आयोग सन २०१९-२०२० मंजूर आराखडा नुसार अदा केलेली बिले पंचायत समिती प्रशासनाने कॅशबुकमध्ये पडताळून पाहिली पाहिजेत. सरपंच यांच्या अज्ञानाचा गैरफायदा ग्राम विकास अधिकारी घेत असतील तर ते त्यांच्या पदासाठी अशोभनीय आहे.
– सौ.श्रावस्ती सचिन अभंगे
माजी सदस्या ममदापूर
ग्रामपंचायत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close