ताज्या घडामोडी

पोशीर मोबाईल टॉवरप्रकरणी चौकशी समितीची आक्षेपार्ह भूमिका तहसीलदारांना दिला ‘अपूर्ण ‘अहवाल ग्रामपंचायत व संबंधित टॉवरकंपनीच्या अक्षम्य चुकांवर पांघरूण

पोशीर मोबाईल टॉवरप्रकरणी चौकशी समितीची आक्षेपार्ह भूमिका
तहसीलदारांना दिला ‘अपूर्ण ‘अहवाल

ग्रामपंचायत व संबंधित टॉवरकंपनीच्या अक्षम्य चुकांवर पांघरूण

नेरळ : दिपक बोराडे
पोशीर येथील अनधिकृत मोबाईल टॉवरप्रकरणी पोशीर ग्रामपंचायत व संबंधित टॉवरकंपनीच्या अक्षम्य चुकांवर पांघरूण घालत कर्जत पंचायत समितीने अपूर्ण अहवाल वरिष्ठ कार्यालयांना सादर केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आली आहे. पोशीर ग्रामपंचायतीचे सरपंच -कार्यकारिणी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी कर्तव्यात केलेला अक्षम्य हलगर्जीपणा जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आल्याने चौकशी अहवालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पोशीर गावातील वादग्रस्त अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नसताना पोशीर ग्रामपंचायतीने नाहरकत दिलेली होती व ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही दुर्लक्ष केले होते. याप्रकरणी ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
सदर 16 जून रोजी पोशीर ग्रामपंचायत कार्यालयात केलेल्या चौकशीस पोशीर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच इंडस टॉवरचे प्रतिनिधी अनुपस्थित असतानाही सुनावणी घेतली गेली. या सुनावणीदरम्यान अर्जदार कृष्णा हाबळे यांनी घेतलेल्या आक्षेपांची व त्यांनी दि .25 जून 2021रोजी सादर केलेल्या लेखी जबाबाचीही नोंद चौकशी समितीने घेतली नाही. या सुनावणीत चौकशी अधिकारी उज्वला भोसले यांनी तक्रारदारांना चौकशी संबंधित कागदपत्रे व पुरावे पोशीर ग्रामविकास अधिकारी अशोक रौदळ यांच्याकडे सादर करण्यासंबंधी आक्षेपार्ह सूचना केली होती. चौकशी संबंधित पोशीर ग्रामपंचायत इतिवृत्त नोंदी, आवक -जावक व संबंधित पत्रव्यवहार आदी बाबी जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आल्या. इंडस टॉवर कंपनीला काम बंद करण्याचे आदेश असतानाही 3 जून ते आजतागायत टॉवर कंपनीने काम सुरू ठेवले परिणामस्वरूप टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आहे या गंभीर बाबीची नोंद चौकशी समितीने घेतली नाही. सदर टॉवरच्या रचना स्थिरता व फ्रिक्वेन्सीसंबधित बाबींची नोंद अहवालात करण्यात आली नाही. पोशीर ग्रामपंचायतने अकृषक परवानगी नसताना नाहरकत देऊन शासन परिपत्रक -VPM 2005/प्र.क्र.245दि .22ऑगस्ट 2005ची अवहेलना केल्याची गंभीर बाब चौकशी समितीकडून दुर्लक्षित करण्यात आली. तसेच पोशीर ग्रामपंचायतने टॉवर उभारणीच्या कालावधीत एकीकडे काम बंद केल्याच्या नोटिसा देत काम सुरू असल्याच्या तक्रारीनंतरही कारवाई केली नसल्याची गंभीर बाब चौकशी समितीने दुर्लक्षित केली.
तक्रारदार कृष्णा हाबळे यांनी ग्रामपंचायत पोशीर यांच्याकडे केलेली तक्रार व चौकशी समिती ला तक्रारदार यांनी सादर केलेला लेखी जबाब यांची नोंद चौकशी समितीने अहवालात घेतलेली नाही .सदर प्रकरणी पोशीर ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांची भेट घेऊन अनेक आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आणून दिल्या. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठवला जाईल असे त्यांनी सांगितले. मोबाईल टॉवरप्रकरणी कर्जत पंचायत समितीची चौकशी समिती अज्ञात राजकीय दबावाखाली तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

चौकट
मासिक इतिवृत्तात संशयास्पद छेडछाड इंडस टॉवरला नाहरकत देण्याचा ठराव ज्या मासिक सभेत झाला त्या इतिवृत्ताचे लेखन चार वेगळ्या हस्ताक्षरात केले असल्याने तक्रारदारानी गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी इतिवृत्तातील काही हस्ताक्षर कर्मचाऱ्यांचे असल्याची कबुली ग्रामविकास अधिकारी अशोक रौंदल यांनी वरिष्ठांसमोर आणि उपस्थित ग्रामस्थांसमोर दिली.

चौकट
ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाने पारित केलेले अधिनियम आणि परिपत्रके यांच्या अधीन राहून नाहरकत देणे बंधनकारक आहे. आवश्यक त्या परवानग्या न घेता नाहरकत देणे बेकायदेशीर आहे. नियमबाह्य नाहरकत दिल्यास संबंधितांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.
-अँड पंकज तरे
स्थानिक स्वराज्य संस्था कायदे अभ्यासक

चौकट
सदर पोशीर टॉवर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठवला जाईल.
– बालाजी पुरी
गटविकास अधिकारी
पंचायत समिती,कर्जत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close