ताज्या घडामोडी

कबुलीजबाब म्हणजे काय? आरोपीविरुद्ध पोलीस व न्यायालयाची भूमिका नेमकी काय असते?*

*कबुलीजबाब म्हणजे काय? आरोपीविरुद्ध पोलीस व न्यायालयाची भूमिका नेमकी काय असते?*

प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

� अनेकदा वर्तमानपत्रात तसेच टीव्हीवर एखाद्या गुन्ह्यातील आरोपीने कबूलीजबाब दिल्याचे आपण ऐकत असतो. हा कबूलीजबाब न्यायालयात केव्हा ग्राह्य धरला जातो? यात आरोपी व पोलिसांची भूमिका काय असते याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

� *कबुलीजबाब म्हणजे काय ?*

गुन्ह्याच्या चौकशीच्या कामी पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर आरोपी आपण केलेला गुन्हा काही प्रसंगी कबूल करतो. एखाद्या गोष्टीस मान्यता देणारे निवेदन, कायद्याच्या परिभाषेत गुन्ह्याच्या कबुलीस ‘कबुलीजबाब’ म्हणतात.

❓ *कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो का ?*

● पुष्कळ वेळा असा कबुलीजबाब देताना आरोपी गुन्ह्याकरिता वापरलेले शस्त्र आपण कुठे ठेवले आहे अथवा गुन्ह्यात मिळालेली लूट किंवा मालमत्ता कुठे लपवून ठेवली आहे अथवा मयताचे प्रेत कुठे टाकून दिले आहे वगैरे बाबींची माहिती पोलिसांना देतो.

● अशा वेळी कबुलीजबाबापैकी ज्या कथनानुसार पोलिसांना गुन्ह्यातील वस्तूंचा शोध लागतो ते कथन ग्राह्य असल्यामुळे कबुलीजबाब म्हणून पुराव्यातून वगळता येत नाही.

● पुष्कळ वेळा आरोपीवर अधिकार असलेल्या व्यक्तीकडून दडपण आल्यामुळे किंवा धाकदपटशा अथवा आमिष दाखविल्यामुळे किंवा सुटकेचे अगर तत्सम आश्वासन मिळाल्यामुळे आरोपी अशा अधिकारी व्यक्तीपुढे कबुलीजबाब देण्यास प्रवृत्त होतो पण तो पुराव्यात अग्राह्य ठरतो.

● मालक नोकर संबंधात आरोपित नोकराकडून मालक अशा तर्‍हेने कबुलीजबाब मिळवू शकतो पण हा कबुलीजबाब वरीलप्रमाणे अनिष्ट मार्गाने मिळविलेला असल्यामुळे तो पुराव्यात दाखल होऊ शकत नाही.

● अबकारी अथवा जकात गुन्ह्यांची चौकशी करणारा अधिकारी हा पोलीस अधिकारी नसला, तरी आरोपितांकडून कबुलीजबाब घेताना तो आरोपितावर वर्चस्व असलेला अधिकारी आहे, असे समजण्यात येते. म्हणून त्यायोगे मिळविलेला कबुलीजबाबही अग्राह्यच समजण्यात येतो.

 *न्यायालयात कबुलीजबाब ग्राह्य केव्हा धरतात?*

🔖 धमकी, आश्वासन अगर आमिष यांपैकी कोणत्याही कारणामुळे आलेले दडपण नष्ट होऊन चांगल्या मनःस्थितीत आरोपीने कबुलीजबाब दिला आहे, असे न्यायालयास दिसून आल्यास तो कबुलीजबाब ग्राह्य होतो.

🔖 कबुलीजबाब देते वेळी आरोपी नशेत होता, या कारणाकरिता कबुलीजबाब अग्राह्य होत नाही.

🔖 कबुलीजबाब गुप्त राखण्याचे वचन दिले किंवा आरोपीस फसवून कबुलीजबाब मिळविला एवढ्याच कारणाकरिता कबुलीजबाब अग्राह्य होत नाही.

🔖 विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना गरज नसताना आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली अथवा कबुलीजबाब पुराव्यात घेतला जाईल अशी आगाऊ सूचना न देता मिळविलेला कबुलीजबाबही अग्राह्य धरला जात नाही.

🔖 दोन अथवा जास्त आरोपी न्यायालयासमोर असता त्यांपैकी एकाने स्वतःला व दुसऱ्यासही गोवणारा कबुलीजबाब दिला, तर तो कबुलीजबाब दुसऱ्या आरोपीविरुद्ध पुरावा म्हणून न्यायालयाच्या विचाराधीन होऊ शकतो.

🚔 *पोलिस-आरोपी व न्यायालय*

🔅 पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब कोणत्याही परिस्थितीत अग्राह्य आहे.

🔅 पण कबुलीजबाब देण्याची इच्छा असणाऱ्या आरोपितास पोलिसांनी दंडाधिकाऱ्यासमोर नेले व जर दंडाधिकाऱ्याने तो कबुलीजबाब उतरून घेतला, तर असा कबुलीजबाब न्यायालयात ग्राह्य होतो.

🔅 अशा वेळी दंडाधिकारी आरोपीचा एकदम कबुलीजबाब न घेता त्यास विचार करण्यास विशिष्ट अवधी देतो.

🔅 त्याचप्रमाणे पोलिसांच्या मारहाणीमुळे, धमकीमुळे, आश्वासनामुळे किंवा आमिषामुळे हा कबुलीजबाब देण्यात आलेला नाही, अशी खात्री करून घेऊन नंतर आरोपी कबुलीजबाब देण्यास बांधलेला नाही आणि जर त्याने कबुलीजबाब दिला, तर तो पुराव्यात त्याच्याविरुद्ध वापरला जाईल, हे दंडाधिकारी समजावून सांगतो व त्यानंतर आरोपीने दिलेला कबुलीजबाब तो उतरून घेतो.

🔅 कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला, असे जर आरोपीने सांगितले, तर ते सिद्ध करण्याचा भार त्याच्यावर असतो.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close