ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी सरकारी जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वितरीत करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी*

*येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी सरकारी जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वितरीत करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी*

*नाशिक,येवला,दि.३१ मार्च:-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन कार्यक्रमांअंतर्गत येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेस कार्यारंभ आदेश निर्गमित झाले आहे. मात्र या योजनेच्या जागा हस्तांतरणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने काम सुरु होऊ शकले नव्हते. छगन भुजबळ यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून या योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवला मतदारसंघाला टँकरमुक्त करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी येवला मतदारसंघात विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून येवला तालुका हा दुष्काळमुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे. येवला तालुक्यातील अडतीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांव व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी दिलेल्या होत्या. त्यानुसार शासनाने ६३ कोटी ४४ लक्ष च्या या योजनेला प्रशासकिय मंजूरी दिली होती.

या योजनेचा कार्यारंभ आदेश निर्गमित झालेला आहे. मात्र जागा हस्तांतरण प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित होता. यासाठी छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या जागा हस्तांतरण प्रस्तावास जिल्हाधिकारी नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील पिंपरी येथील गट नंबर १३२ व २९१ पैकी ०७ हेक्टर ९२ आर क्षेत्र धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत साठवण तलाव १ व २ जलशुद्धीकरण केंद्र व आरसीसी जलकुंभ या सार्वजनिक प्रयोजनासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सदरची शासकीय जागा ही मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचे मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नाशिक यांना पाणी पुरवठा योजनेच्या प्रयोजनासाठी वितरीत करण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

या योजनेमुळे येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिचोंडी बु., चिचोंडी खु.,सताळी, बदापूर या गांवाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!